स्वस्त होणार राजधानी, शताब्दीचा प्रवास


नवी दिल्ली – आता रेल्वे मंत्रालयाने राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमधील सीट्स रिकाम्या असल्याने फ्लेक्सी फेअर पद्धतीमध्ये बदल करण्याची तयारी केली असून यानुसार आता या गाड्यांमधील बेसिक भाडे १५ टक्क्यांनी वाढवण्याचा किंवा या ट्रेनमधील ५० टक्के सीट्स या सामान्य दरात उपलब्ध करुन देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार असल्यामुळे राजधानी, शताब्दी यासारख्या गाड्यांचे दर कमी होऊ शकतील.

उत्पन्नवाढीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रेल्वे मंत्रालयाने प्रीमियम गाड्यांमध्ये फ्लेक्सी फेअर योजना सुरु केली होती. यानुसार पहिली १० टक्के तिकिटे निश्चित दरामध्ये उपलब्ध असतात. यानंतरच्या तिकिटांचे दर १०-१० टक्क्यांनी वाढत जाते. यामध्ये ५० टक्क्यांपर्यंत तिकिटाचे दर वाढू शकते. मात्र यामुळे राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या गाडांमध्ये काही सीट्स रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले होते.

आता फ्लेक्सी फेअरचा फेरआढावा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. त्यांनी यात पुन्हा फ्लेक्सी फेअरमध्ये बदल करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते. रेल्वेने आत्तापर्यंत फ्लेक्सी फेअरमधून २६० कोटी रुपये कमावले आहेत. आता हा आकडा ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा रेल्वेचे लक्ष्य आहे. फ्लेक्सी फेअर लागू झाल्यापासून अडीचशे कोटी कमावले असले तरी त्याच मार्गावरील किमान एक लाख प्रवासी कमी झाल्याचे समोर आले आहे.

आता या गाड्यांमधील बेसिक भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा किंवा या गाड्यातील ५० टक्के जागा या सामान्य दरात उपलब्ध करुन देण्याचा विचार रेल्वेने सुरु केला असून रेल्वेच्या उत्पन्नात घटही होणार नाही आणि प्रवाशांनाही याचा फायदा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment