नक्कल रोखण्यासाठी युरोपमध्ये नव्या नोटा


चलनी नोटांची नक्कल रोखण्यासाठी युरोपमध्ये ५० युरो किमतीच्या नव्या नोटा आणण्यात येत आहेत. युरोझोनमधील १९ देशांमध्ये या नोटा चलनात असतील. मात्र त्यांच्यासोबत जुन्या नोटाही काही दिवस चालतील.

युरोपीयन सेंट्रल बँक या युरोपच्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारपासून या नव्या नोटा सुरू केल्या. त्यात सुरक्षेचे अनेक उपाय केले असून यामुळे बनावट नोटा बनविणे अवघड होणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.

या नव्या नोटेवर उठावदार छपाई करण्यात आली आहे. तसेच त्यावर एका धातूच्या पट्टीवर पारदर्शक खिडकी असून त्यात युरोपा या ग्रीक देवतेचे चित्र असेल. याच देवतेच्या नावावरून या खंडाला युरोप हे नाव मिळाले आहे. त्यावरील रंग पाचूसारखा आहे, मात्र नोट फिरवताच तो बदलतो.

ही नवी नोट युरोपा या मालिकेतील नोट असून तिच्यावर प्राचीन युरोपीयन वास्तुकलेचे प्रदर्शन केलेले आहे. यानंतर १०० व २०० युरोच्या नोटा आणण्यात येणार आहेत, मात्र ५०० युरोच्या येणार नाहीत. कारण बेकायदा कृत्यांसाठी त्या वापरण्यात येत असल्यामुळे २०१८ च्या शेवटपर्यंत त्या रद्द करण्याचे ईसीबीने ठरवले आहे.

“सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत नाविन्यपूर्ण नोट आहे,” असे बँक ऑफ फ्रान्सचे अधिकारी गिल्स व्हेसेट यांनी सांगितले. युरो ही जगातील सर्वात कमी नक्कल होणाऱ्या नोटांपैकी एक आहे, असे बँक ऑफ फ्रान्सने म्हटले आहे.

Leave a Comment