सम्रुदाच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनविणारी चाळणी


पिण्याच्या पाण्याची जगभरात जाणवत असलेली टंचाई संपुष्टात आणण्याचा मार्ग वैज्ञानिकांच्या हाती आला असून समुद्रापासून पिण्यायोग्य पाणी बनविणारी चाळणी त्यांनी तयार केली आहे. भारतवंशीय प्रो.राहुल नायर व त्यांच्या अन्य सहकारी वैज्ञानिकांनी ब्रिटन युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमध्ये या संदर्भातले संशोधन पूर्ण करून ग्रेफिन पासून ही चाळणी बनविली आहे. यामुळे लाखो लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकणार आहे. अर्थात त्यासाठी आणखी कांही संशोधन करणे सुरू आहे.

प्रो. नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेफीन ऑक्साईडपासून बनविलेली ही चाळणी पाण्यात गेल्यावर फुलते. समुद्रातील पाण्याचे मीठाचे मोठे कण ती वेगळे करते मात्र छोटे कण वेगळे होत नाहीत. यासाठी हे छोटे कणही वेगळे करू शकेल असे प्रयत्न केले गेले. त्यात अणुच्या आकाराचे मिठाचे कणही रोखून धरणारे सूक्ष्म छिद्र तयार करण्यात यश आल्याने मोठ्या प्रमाणावर समूद्री पाण्यापासून पेयजल तयार करण्याची दारे उघडली आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात ९.७ कोटी लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के लोक भारतात राहतात. त्यातच गेल्या शतकात प्रतिव्यक्ती पाणी उपलब्धता वेगाने कमी होत चालली असताना पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी अशा चाळण्या फारच उपयुक्त ठरणार आहेत. हे संशोधन नेचर नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment