रक्षकाच्या पुनर्भेटीने गहिवरले दलाई लामा


तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा रविवारी भावूक झाले. निमित्त होते, दलाई लामांनी ५८ वर्षांपूर्वी तिबेटमधून पलायन करून भारतात सुरक्षित आश्रय घेण्यासाठी येत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडलेल्या आसाम रायफल्सच्या माजी जवानाची भेट. आसाम सरकारने आयेाजित केलेल्या नमामी ब्रह्मपुत्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दलाई लामा आले, तेव्हा या गार्डची त्यांनी गळाभेट घेतली व त्याला मनःपूर्वक धन्यवाद दिले.

दलाई लामांनी तिबेट सोडून मार्च १९५९ च्या सुमारास भारतात आश्रय घेतला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या पाच जवानांपैकी एक नरेंद्र चंद्र दास होते. आज नरेंद्र दासही ७६ वर्षांचे आहेत. या कार्यक्रमासाठी ते संपूर्ण गणवेशात आले होते. दलाईंनी इतक्या जुन्या काळात मला संरक्षण दिलेल्या जवानाची भेट घेऊन खूपच आनंद झाल्याचे सांगतानाच त्यांचे आभार मानले. यावेळी दलाई लामा एकदम गहीवरले. ते म्हणाले, आता तुमच्याकडे पुन्हा ५८ वर्षांच्या काळानंतर पाहताना मला कळतेय, मीही किती म्हातारा झालोय ते.

नरेंद्र दास आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, लामांना सुरक्षीत आणण्यासाठी मी आसाम रायफ ल्स पथकात होतो व मला लष्करात भरती होऊन दोन वर्षेच झाली होती. आसाम रायफल्सच्या प्लॅटून ९ ने लामांना आमच्याकडे लुटांग्बो येथे सोपविले व आम्ही त्यांना लुंग्टन येथपर्यंत सुरक्षित घेऊन आलो. प्रवासात त्यांच्याबरोबर कांहीही बोलण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांच्या गळाभेटीने आज मी भरून पावलोय. दलाईंनी यावेळी सिल्कची शाल दास यांना दिली तसेच त्या प्रवासादरम्यानच्या जुन्या फोटोवर सही करून तो आसाम रायफल्सकडे दिला.

Leave a Comment