मोठ्या मूल्यांच्या म्हणजे ५०० व दोन हजार रूपये मूल्यांच्या नोटांची सुरक्षा फिचर्स दर तीन ते चार वर्षांनी बदलण्याबाबत सरकारने योजना तयार केली असून त्यामुळे बनावट नोटांवर नियंत्रण आणण्यात मोठीच मदत होणार आहे. या संदर्भात अर्थ व गृह मंत्रालयांच्या वरीष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. गृहमंत्रालयचे सचिव राजीव महर्षी या बैठकीला उपस्थित होते.
दर तीन, चार वर्षानी बदलणार नोटांची सुरक्षा फिचर्स
मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक सर्व बड्या देशांत चलनी नोटांच्या सुरक्षा फिचर्समध्ये कांही वर्षांच्या अंतराने बदल गेले जातात. त्या स्तरावरच भारतातही ही योजना राबविली जाणार आहे. नोटबंदी नंतर गेल्या कांही महिन्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे व त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सुरक्षा फिचर्समध्ये ठराविक काळानंतर केलेले बदल त्याकामी फारच उपयुक्त ठरू शकतात. १ हजाराची नोट जेव्हा प्रथम चलनात आली तेव्हापासून तसेच ५०० रूपयांच्या नोटा १९८७ मध्ये आल्या तेव्हापासून या नोटांची सुरक्षा फिचर्स बदलली गेलेली नाहीत. इतकेच नव्हे तर २ हजारांच्या नव्या नोटेत हजारांच्या नोटांमधील १७ फिचर्सपैकी ११ जशीच्या तशी आहेत.
बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकांकडून मिळविल्या गेलेल्या माहितीत बनावट नोटा पाकिस्तानात आयएसआयच्या मदतीने तयार करण्यात आल्या व बांग्लादेशातून भारतात पाठविल्या गेल्याचे उघड झाले आहे.