उडानला गती


देशातल्या हवाई प्रवासी वाहतुकीला गती देण्यासाठी भाजपा सरकारने आखलेल्या उडान या योेजनेखाली ४३ विभागीय विमानतळे निवडली असून येत्या दोन-तीन महिन्यात सध्या बंद असलेल्या या विमानतळावरून नजिकच्या मोठ्या विमानतळापर्यंत विमानाच्या फेर्‍या सुरू होणार आहेत. एका तासाच्या प्रवासाला २५०० रुपये दर असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विमानसेवा सुरू झाल्यानंतर देशातील ७० विमानतळे एकमेकांशी जोडली जातील आणि त्यांच्या जोडणीतून १२७ मार्गांवर विमाने उडायला लागतील. देशातल्या मध्यमवर्गीय लोकांची विमानाने प्रवास करण्याची ऐपत आहे परंतु म्हणावी तशी विमानसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे खिशात पैसा असून आणि गरज असूनही हे लोक विमान प्रवास करू शकत नाहीत. ही कोंडी सरकारने आता फोडली आहे.

या विमानसेवा परवडत नाहीत म्हणून त्या त्या कंपन्यांनी काही काळ सुरू करून चालवण्याचा प्रयत्न करून बंद केल्या होत्या. मात्र आता सरकारने त्यांना त्या परवडाव्यात या दृष्टीने काही सवलत देण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच ही योजना आता कार्यरत होत आहे. सरकारने या विमान कंपन्याना या योजनेसाठी ५ विमान कंपन्यांशी करार केलेले आहेत. स्पाईस जेट, टर्बो मेगा एअरवेज, एअर डेक्कन, एअर ओडिशा एव्हिएशन आणि अलायन्स एअर अशा त्या पाच कंपन्या आहेत. या कंपन्यांना सरकारच्या सवलती जाहीर झाल्या असल्या तरी त्या बदल्यात प्रत्येक विमान उड्डाणातील ५० टक्के आसने दर ताशी अडीच हजार रुपये दराच्या प्रवाशांसाठी राखून ठेवावी लागतील. या सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या प्रवाशांनासुध्दा या प्रवासासाठी आगावू नोंदणी करावी लागेल.

या योजनेतून महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, नांदेेड, नाशिक, कोल्हापूर या पाच विमानतळांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय देशभरातील सिमला, आग्रा, बिकानेर, ग्वाल्हेर, कडप्पा, रुरकेला, झारसुबुडा, विद्यानगर, दिवू, शिलॉंग, कुलू, मैसूर, जगदलपूर, सालेम, होसूर या विमानतळांचाही समावेश या पहिल्या टप्प्यात झाला आहे. या सेवा सुरू करणार्‍या विमान कंपन्यांना काही करांमध्ये सूट दिली जाणार आहे आणि मंजूर झालेल्या विभागीय मार्गावर तीन वर्षांपर्यंत सेवा देण्याचा म्हणजे व्यवसाय करण्याचा अधिकार त्यांना राहणार आहे.

Leave a Comment