शिवापूर बाबा हजरत कमर दर्ग्यातील चमत्कार


आपल्याकडे चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी एक म्हण आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे काही ना कांही अतर्क्य गोष्टी घडत असतात व त्यामागचे विज्ञान सांगता येत नाही. अनेक मंदिरे, दर्गे यासाठी प्रसिद्ध आहेत. पुण्याजवळ असलेल्या शिवापूर येथील बाबा हजरत कमर अली दर्गा याला अपवाद नाही. या दर्ग्यात ९० किलो वजनाचा एक दगड असून तो ११ जणांनी फक्त एक बोट लावून बाबांच्या नावाचा गजर केला की सहजी उचलला जातो. अन्य वेळी हा दगड जागचा हलविणेही कठीण असते.

या दर्ग्यात कोणत्याही जाती धर्माचे समुदायाचे लोक जाऊ शकतात व महिलांनाही येथे प्रवेश करता येतो. कुणीही जाऊन दगड उचलण्याचा हा चमत्कार प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. बाबा हजरत कमर यांचे वयाच्या १८ व्या वर्षीच निधन झाले व त्यानंतर त्यांना संत ही पदवी दिली गेली. हे सूफी संत होते व अनेक चमत्कार करत असत. त्यांच्याकडे असलेल्या चमत्कारीक शक्तींचा अनुभव घेतलेले अनेक जण आजही हयात आहेत. सर्व जाती धर्माचे लोक नवस बोलण्यासाठी या दर्ग्यात येत असतात.

या दर्ग्यात जो दगड आहे तो दर्ग्याबाहेर आणून उचलण्याचे प्रयत्न पूर्वी केले गेले मात्र ते यशस्वी झाले नाहीत असे सांगतात. असाही प्रवाद आहे की ११ पेक्षा कमी अथवा अधिक लोकांनी त्याला हात लावला तरी तो उचलला जात नाहीच पण ११ जणांनी एकसाथ बाबांच्या नावाचा गजर करून फक्त पहिले बोट दगडाला लावले तरी तो डोक्यापेक्षा वर सहजरित्या उचलला जातो.

Leave a Comment