बीएस ३ गाड्या खपवण्यासाठी थेट १२ हजारांची सूट


नवी दिल्ली – दुचाकींवर घसघशीत १२ हजारांची सूट टू व्हीलर मार्केटमध्ये दबदबा असलेल्या दोन प्रमुख कंपन्या हिरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने दिली असून सर्व दुचाकींवर ही सूट नसून फक्त बीएस-३ मॉडेल्सवर देण्यात आली आहे. बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा आदेश दिल्यानंतर बीएस-३ गाड्यांची लवकरात लवकर विक्री करण्याच्या हेतूने ही सूट देण्यात आल्यामुळे दुचाकी विकत घेण्याची इच्छा असणा-या ग्राहकांना फायदा होणार आहे. पण यासाठी आज आणि उद्या असे दोनच दिवस हाती आहेत.

देशभरात तयार असणाऱ्या आणि नोंदणी न झालेल्या जवळपास आठ लाख नव्या कोऱ्या गाड्या सर्वोच्च न्यायालयाच्या या बंदीमुळे भंगारात जाण्याची शक्यता आहे. यामधील ६ लाख ७१ हजार दुचाकी आहेत. यावर तोडगा म्हणजे जितक्या शक्य तितक्या लवकर डेडलाईन संपण्याआधी गाड्यांची विक्री करणे असल्याचे डिलर्सने सांगितले आहे. बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या हिरो मोटोकॉर्पने बीएस-३ मॉडेल्सवर तब्बल १२ हजार ५०० रुपयांची सूट जाहीर केली आहे. डिलर्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनी स्कूटरवर १२ हजार ५००, बाईक्सवर ७ हजार ५०० आणि इतर मोटरसायकलींवर पाच हजारांची सवलत देत आहे.

दुस-या क्रमांकावर असणा-या होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियानेही सवलत जाहीर केली आहे. सर्व बीएस-3 स्कूटर आणि मोटरसायकलींवर १० हजारांची थेट सवलत देण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंतच ही ऑफर उपलब्ध असणार असल्याचेही दोन्ही कंपन्यांनी जाहीर केले आहे. दुचाकी बाजारपेठेत इतकी मोठी सवलत याआधी कधी जाहीर झाली नव्हती, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्सचे निकुंज सांघी यांनी सांगितले आहे.

Leave a Comment