पश्‍चिम बंगालकडे लक्ष


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवणडणुकीत भाजपाला यश मिळाले असले तरी जोपर्यंत पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू या दोन मोठ्या राज्यात आणि केरळ तसेच ओरिसा या छोट्या राज्यात भाजपाला पाय ठेवायला जागा मिळत नाही तोपर्यंत भाजपाचे हे यश चिरस्थायी होणार नाही. म्हणून भाजपाचे समर्थक आणि विरोधक असे दोघेही या चार राज्यात भाजपाची घोडदौड कशी आहे यावर लक्ष ठेवून आहेत. अद्याप तरी तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये भाजपाला फार यश मिळाले नाही. परंतु ओरिसाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने कॉंग्रेसला हटवून दुसरा क्रमांक मिळवल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ओरिसाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आणि तिच्या सोबत होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत ओरिसात भाजपाचा प्रभाव जाणवेल असे आता बोलले जात आहे. ओरिसाच्या पाठोपाठ आता पश्‍चिम बंगालमध्ये पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पश्‍चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक २०१६ साली झालेली आहे आणि आता २०२१ साली होणार आहे. तत्पूर्वी २०१८ हे वर्ष पश्‍चिम बंगालच्या पंचायतींच्या निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे या निवडणुकांत भाजपाची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीत भाजपाची कामगिरी चांगली झाली तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रभाव पडेल असे सर्वांना वाटत आहे.

या निवडणुकांत भाजपावरच लक्ष लागण्याचे कारण काय? कारण असे आहे की भाजपाचे नेते पश्‍चिम बंगालवर लक्ष केंद्रित करून या राज्यात आपला प्रभाव वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होणार आहेत. विधानसभेच्या २०१६ च्या निवडणुका होण्यापूर्वी पश्‍चिम बंगालमध्ये संघाच्या नित्य शाखांची संख्या ४७५ होती. ती आता १६८० झाली आहे. संघ शाखांची ही वाढ सर्वांना चक्रावून टाकणारी ठरली आहे. ही शाखांची वाढ प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे आणि त्यामुळे या शाखा वाढीचा परिणाम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये जाणवेल अशी भाजपाच्या नेत्यांची आशा तर आहेच पण भाजपाच्या विरोधकांना तशी भीतीही वाटत आहे. भारतीय जनता पार्टीला पश्‍चिम बंगालमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी डावी आघाडी, कॉंग्रेस आणि तृणमूूल कॉंग्रेस अशा तीन प्रतिस्पर्ध्यांशी लढत द्यावी लागत आहे.

Leave a Comment