पदार्थांच्या वेष्टनातील विष


आपण बाजारातून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ खरेदी करतो. आता हॉटेलातून ताजे तयार खाद्य पदार्थसुध्दा बांधून घरी देण्याची सोय झाली आहे. इडली सांबर, वडा सांबर असे पदार्थ कधी पार्सल म्हणून घरी नेले जातील असे वाटले नव्हते पण तेही पार्सल म्हणून दिले जायला लागले आहेत. मात्र त्यांचे पार्सल तयार करताना वापरल्या जाणार्‍या वेष्टनांच्या कागदामध्ये कोणत्या प्रकारचे रासायनिक घटक असतात आणि त्यांचे शरीरावर काय परिणाम होत असतात याचा फारसा अभ्यास झालेला नव्हता. प्रत्यक्षात हे सर्व रासायनिक घटक आपल्या जिवाला धोका निर्माण करणारे आणि सूक्ष्म प्रमाणात विषबाधा करणारे असू शकतात. या वेष्टनांचे रासायनिक पृथःकरण करण्याची सोय आजवर नव्हती.

अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मात्र वेष्टन म्हणून आलेल्या कागदातील रसायनांचे पृथःकरण करण्याची पध्दत शोधून काढली आहे आणि हे रासायनिक घटक शरीरात कोणत्या अवयवात जाऊन कोणत्या प्रकारचे दोष निर्माण करतात यावरही संशोधन केले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अलाबामामधील शास्त्रज्ञांनी राज्यातल्या विविध उपहार गृहातील फास्ट फूड गुंडाळून देण्याच्या पध्दती आणि साधने यांचे विश्‍लेषण केले आणि त्यातून कसे त्रासदायक घटक आपल्या शरीरात जात असतात हे दाखवून दिले. अशा प्रकारचे विश्‍लेषण प्रथमच केले गेले आहे.

डॉ. सुझान लापी यांनी हे संशोधन केले असून कागदाला जोडून येणारे रासायनिक पदार्थ शरीराच्या बहुतेक भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात शोषले जातात असे दाखवून दिले आहे. त्यातल्या त्यात ही रासायनिक द्रव्ये यकृत आणि जठर यात प्राधान्याने शोषले जातात. तसेच फुफ्फुसातही ते शोषले जातात आणि त्या त्या अवयवांवर दुष्परिणाम करतात. ब्रेडला आवरण म्हणून वापरला जाणारा कागद हा या बाबतीत सर्वाधिक दुष्परिणाम घडवणारा असल्याचे लक्षात आले असून त्यामध्ये ५६ टक्के एवढे प्रमाण आढळले आहे. सँडविच आणि बर्गर बांधून दिल्या जाणार्‍या कागदात ३२ टक्के विषारी द्रव्ये असण्याची शक्यता दिसून आली आहे. तर बहुतेक पदार्थांना पॅक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पेपर बोर्डमध्ये २० टक्के विषारी द्रव्ये असल्याचे दिसले आहे. या विषारी द्रव्याचे परिणाम म्हणून किडीनचा कॅन्सर होऊ शकतो. त्याच बरोबर प्रजनन क्षमता घटते आणि थायरॉईड ग्र्रंथींचे असंतुलन होऊ शकते.

Leave a Comment