जपान हा देशच मुळी एखाद्या परिराज्यासारखा आहे. त्यात मार्च एप्रिल हे महिने म्हणजे साकुराचे दिवस. या काळात जपानमध्ये चेरी फुलतात व वसंताचे आगमन होते. जपानमध्ये साकुरा किंवा चेरीचा बहर पाहण्यासाठी अनेक सुंदर स्थळे असून या काळात पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. आठवड्याभराचा हा चेरीचा बहर सार्या जपानला हलक्या गुलाबी रंगात रंगवितो व या निमित्ताने शेकडो वर्षांपासून जपानमध्ये साकुरा उत्सव साजरा केला जातो. चेरीचे फुल किंवा साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फुल असून हे अतिशय नाजूक व मोहक आहे. या फुलाकडे आशेचे फुल म्हणूनही जपानी पाहतात.
जपानात चेरी फुलल्या
डोंगररांगावर बहरलेली चेरीची झाडे पाहणे हा एक नयनोत्सव असतो. विशेषतः चांदण्या रात्री हा बहर पाहण्याची संधी मिळणे म्हणजे स्वर्गभेटीची संधी मानली जाते. किन्काकू जी, नारा, युनो पार्क अशी शेकडो स्थळे या काळात चेरीने बहरलेली असतात व तेथे पर्यटकांबरोबच जपानी लोकांचीही खूप गर्दी होते. पांढरे व थोडा गुलाबी रंग असलेले हे फूल जीवन क्षणभंगूर आहे तेव्हा त्याचा उपभोग घ्या असा संदेश देते. जपानमध्ये साकुराच्या २०० पेक्षा अधिक जाती आहेत. साधारणपणे २६ मार्च ते ११ एप्रिल या काळात हा बहर असतो.