उन्हाळच्याची काहिली सुरू असताना आंबा खायची नुसती कल्पनाही पोटात गारवा निर्माण करते. आजकाल बाजारात आंबा कितीही प्रमाणात आला तरी सर्वसामान्यांसाठी त्याचे दर चढे असतात. अशा वेळी कुणी फुकट व तेही पोटभर आंबे खायला घालत असेल तर? ही संधी आणली आहे मध्यप्रदेशातील जौलखेडा भागातील तरूण शेतकरी सतीश हिंगवे यांनी.
आमराईत चला आणि मनसोक्त आंबे फुकट खा
घडलेली हकीकत अशी की सतीश हेही आंब्याचे खूप शौकीन. एकदा दुसर्याच्या शेतातले आंबे दगड पाडून खाली पाडताना त्या शेतकर्याने हिगवे यांचा अपमान केला व अपशब्दांचा वापर केला. शिवाय आंबे पाडल्याबद्दल १०० रूपये वसूल केले ते वेगळे. सतीश यांच्या मनाला ही घटना फारच लागली व त्यानी त्यांची शेत जमीन प्रचंड कष्ट करून समतल करून घेतली व तेथे ४०० आंबा कलमे लावली. पावसाळ्यात झाडे तरारली पण उन्हाळ्यात सुकू लागली तेव्हा त्यांनी ठिबक सिंचनाने बाग जगवली. आता ही बाग चांगली मोहरावर आली असून यंदा आंब्याचे चांगले पीक येणार असल्याची लक्षणे आहेत. केवळ आंबा खाण्याच्या इच्छेपोटी कुणाला मानहानी सोसावी लागू नये म्हणून सतीश यांनी त्यांच्या आमराईत येणार्यांना मोफत आंबे खायला घालणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्या बागेत केसर, दशेरा, रतन असे अनेक जातीचे आंबे लावले गेले आहेत.