१० टक्के कर्मचारी कपात करणार एसबीआय


नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठय़ा बँक भारतीय स्टेट बँकेने पुढील दोन वर्षात दहा टक्क्यांपर्यंत कर्मचा-यांत कपात करण्याचे संकेत दिले आहेत. १ एप्रिलपासून सहा सहयोगी बँकांचे विलीनीकरण एसबीआयमध्ये करण्यास प्रारंभ होणार आहे. आपल्या खर्चात कपात करण्यासाठी आणि नवीन रोजगार कमी करणे आणि संगणकीयकरणाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.

रोजगाराच्या संधी तंत्रज्ञानात बदल होत असल्याने कमी होत जातात. रोजगारात आगामी दोन वर्षात दहा टक्क्यांपर्यंत कमी येण्याची शक्यता आहे, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी म्हटले. एसबीआयमध्ये सध्या २,०७,००० कर्मचारी कार्यरत असून १ एप्रिलनंतर सहा सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर ७० हजाराने हा आकडा वाढणार आहे. भविष्यात नवीन बँक शाखा उघडण्याचे धोरण कायम सुरू राहणार आहे. पुढील दोन वर्षात किती नवीन शाखा उघडाव्या लागतील याचा विचार बँकेकडून सुरू आहे. विलीनीकरणाचा बँकेला फायदा होणार असून खर्चात बचत होण्याचा अंदाज आहे.

अन्य बँकांचे विलीनीकरण एसबीआयमध्ये झाल्यानंतर सर्व कर्मचा-यांची संख्या २,७७,००० वर पोहोचणार आहे. २०१९ पर्यंत कर्मचारी संख्येत १० टक्क्यांनी घट होईल. नवीन कर्मचारी भरतीनंतर मार्च २०१९ पर्यंत ही संख्या २,६०,००० पर्यंत घसरेल. विलीनीकरणाचा बँकेवर आणि कामकाजावरील परिणामाचा अभ्यास करण्यात येणार आहे. अनेक कर्मचा-यांना स्वेच्छानिवृत्तीचाही पर्याय देण्यात आला आहे. मात्र कर्मचारी भरतीची प्रक्रिया थांबविण्यात येणार नाही. ती प्रतिवर्षी ५० टक्क्यांनी कमी करण्यात येईल, असे रजनीश कुमार यांनी म्हटले.

Leave a Comment