हिंदू राष्ट्र म्हणजे काय?


शिवसेनेने काही कारण नसताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनाठायी उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे अशी सूचना मांडली आहे. भारताचे हिंदू राष्ट्र करण्यासाठी सरसंघचालकांना राष्ट्रपती करणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. अर्थात शिवसेनेची ही सूचना एनडीएच्या घटक पक्षांना कितपत मान्य होईल याबद्दल अनेक शंका आहेत आणि मोहन भागवत राष्ट्रपती होण्याची सुदूरसुध्दा शक्यता नाही. परंतु या निमित्ताने हिंदू राष्ट्र या शब्दावर आता वाद होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, संघाचे अंतिम उद्दिष्ट हिंदू राष्ट्र हे असल्याचे सांगत असले तरी हिंदू राष्ट्राची त्यांची कल्पना अतीशय संदिग्ध आहे.

तेव्हा सरसंघचालकांना राष्ट्रपती करताना हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करावी लागणार आहे. हा देश हिंदू राष्ट्र होईल म्हणजे नेमके काय होईल हे संघाने आजपर्यंत कधीही स्पष्ट केलेले नाही. असा काही प्रश्‍नच निर्माण झाला तर संघाचे नेते शब्दांचे खेळ करण्यापलीकडे काही करत नाहीत. कारण हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय हे संघाच्या कोणत्याही वैचारिक भूमिका मांडणार्‍या ग्रथांमध्ये स्पष्ट शब्दात लिहून ठेवलेले नाही. अगदी खासगी बैठकातसुध्दा हा विषय कधी समोर आलाच तर संघाचे नेेते, हा देश हिंदू राष्ट्र आहेच अशा काहीतरी कल्पना बोलून दाखवून विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात. हा देश हिंदू राष्ट्र झाला तर देशाच्या घटनेमध्ये काय बदल होतील असा नेमका प्रश्‍न विचारला तर संघाच्या नेत्यांना काहीही सांगता येत नाही.

शिवसेनेने हिंदू राष्ट्र नावाचा शब्द ज्या रा. स्व. संघाकडून उसना घेतलेला आहे त्या संघाचीच जर या शब्दाने पंचाईत होत असेल तर शिवसेना तरी या प्रश्‍नावर काय उत्तर देणार आहे? किंबहुना आपल्याला असे लक्षात येईल की शिवसेनेेच्या आणि संघाच्याही नेत्यांनी भारताची घटना नीट वाचलेली नसते. त्यामुळे हिंदू राष्ट्र हा त्यांच्यासाठी शाब्दिक करामती करण्याचा आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा विषय असतो. म्हणूनच डॉ. मोहन भागवत यांचे राष्ट्रपती होणेही खरे नाही आणि झालेच तर या देशाचे काही खरे नाही. रा. स्व. संघाची सेवाभावी कामे प्रचंड आहेत. परंतु ज्या एका विचाराच्या आधारे हे सारे चाललेले आहे तो विचार मात्र स्पष्ट नाही. संदिग्ध आहे.

Leave a Comment