मध्यावधीची अफवा


महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात रंग आणत आहेत. प्रत्यक्षात तसे काही नाही झाले तरी या चर्चेमध्ये बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या वर्तणुकीने वैतागून गेले आहेतत. जसा शिवसेनेचा त्रास आहे तसा त्रास नसलेले बहुमत आपल्याकडे असावे म्हणजे आपण राज्यात काहीतरी करू शकू असे त्यांना वाटत असल्यास नवल नाही. अन्य राज्यातले भाजपाचे मुख्यमंत्री अशा त्रासापासून मुक्त आहेत. फडणवीस यांच्या पायात मात्र शिवसेनेची केवळ बेडीच आहे असे नव्हे तर ही बेडी मोठी विचित्र आहे.

राजकारण असो की व्यवसाय असो. जो नेता जोखीम घेऊ शकतो तोच यशस्वी होऊ शकतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या बळावर विधानसभेत यश मिळवण्यासाठी मध्यावधी निवडणुकीची जोखीम घेण्यास आत्ताची परिस्थिती अनुकूल आहे. राज्यामध्ये गेल्या वर्षभरात तीन प्रकारच्या निवडणुका झाल्या. पहिली नगरपालिकेची, दुसरी महानगरपालिकेची आणि तिसरी जिल्हा परिषदेची. पहिल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतच भाजपाला फार चांगले यश मिळणार नाही असा लोकांचा अंदाज होता. परंतु त्या निवडणुकीत तर भाजपाने पहिला क्रमांक मिळवलाच पण नंतरच्या दोन निवडणुकांतसुध्दा पहिल्याच निवडणुकीच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली.

आता या पाठोपाठ भाजपाने विधानसभा निवडणुका घेण्याची जोखीम पत्करली तर ती अनाठायी ठरणार नाही. उलट उत्तर प्रदेश, उत्तरांचल या राज्यातल्या निवडणुकांनी या संबंधात अनुकूल संकेत दिले आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही जोखीम घेतलीच तर तिचा फटका या पूर्वीच्या तीन निवडणुकांप्रमाणेच शिवसेनेला बसू शकतो. किंबहुना तो तसा बसावा या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे नियोजन सुरू आहे. आपल्या विजयाचा आलेख चढताच रहावा यासाठी भाजपाने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षातील काही आमदारांना गळाला लावले असून ते आमदारकी सोडून भाजपात प्रवेश करण्यास तयार झालेले आहेत. त्या आमदारांना फोडून भाजपात आणणे हासुध्दा फडणवीस यांचा डाव आहे.

Leave a Comment