निलेश राणेंनी केले अशोक चव्हाण बेपत्ता असल्याचे ट्वीट


मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला असून अशोक चव्हाण बेपत्ता असल्याचे ट्विट करून नारायण राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेंनी खळबळ उडवून दिली आहे.

दोन आठवड्यापूर्वी निलेश राणेंनी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीड वर्ष नेमला नसल्याच्या कारणावरून अशोक चव्हाणांवर नाराजी व्यक्त करत प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणेंनी अशोक चव्हाणांचे नाव न घेता त्यांच्यावर जाहीर टीका केली होती.

आता थेट निलेश राणे यांनी वरिष्ठ पदी असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाच बेपत्ता घोषित केल्याने राणे कुटुंबीय आणि अशोक चव्हाण यांच्यात खडाजंगी होणार यात शंका नाही. तसेच निलेश राणे यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी बोलणे टाळले आहे.