बदलते जीवनमान गाढव बाजाराच्या मुळावर


शेकडो वर्षांपासून भरत असलेला पाथर्डी तालुलक्यातील मढी या गावचा गाढव बाजार बदलत्या जीवनशैली तसेच आधुनिक तंत्रविकासामुळे मरणावस्थेला पोहोचला आहे. होळी पौर्णिमेपासून ते चैत्री पाडव्यापर्यंत १५ दिवस चालणारा हा बाजार एकेकाळी फारच प्रसिद्ध होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाढव बाजार भरतात पण मढीचा बाजार सर्वात मोठा व सर्वात प्रसिद्ध समजला जातो.

या बाजारात अनेक जातींची व अनेक राज्यातील गाढवे विक्रीसाठी आणली जातात. या बाजारातील उलाढाल कांही वर्षांपूर्वीपर्यंत कोट्यावधी रूपयांची असे मात्र आजकाल त्याची सारी रया गेल्याचे दिसते आहे. गाढवे हा गावोगावच्या बारा बलुतेदारांचा साथीदार प्राणी मानला जात असे कारण कुंभार, बेलदार, कैकाडी अशा अनेक जमातींचे लोक ओझी वाहून नेण्यासाठी प्रामुख्याने गाढवेच वापरत असत. त्यामुळे गाढवे बाजारात हे लोक आवर्जून येत असत व येथे गाढवांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असे. कर्नाटक, गुजराथ आंध्रातील व्यापेारीही येथे हजेरी लावीत. मात्र ओझ्यासाठी गाढवांचा वापर बंद करण्याच्या सरकारी धोरणाचा फटका या बाजाराला बसला आहे तसेच माती वाहणे, वाळू वाहून नेणे अशा अनेक कारणांसाठी गाढवे वापरली जात पण त्याजागी मोठमोठी वाहने व यंत्रे आल्याने गाढवांचा हा उपयोगही राहिलेला नाही.

बारा बलुतेदारांची नवी पिढी पारंपारिक व्यवसायात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे गाढवे पाळण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याचे या समाजांचे लोक सांगतात. नाही म्हणायला खेडेगावातील कुंभार अजूनही माती वाहून नेण्यसाठी गाढवांचा वापर करतात पण तेही प्रमाण कमी होऊ लागले आहे. यामुळे एकेकाळी खेडेगावांसाठी आकर्षण व व्यवसायिक उलाढालीची संधी असलेला हा गाढव बाजार शेवटच्या घटका मोजत आहे.

Leave a Comment