केरळ सरकारला धक्का


केरळात सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीच्या पिरायाइ विजयन यांच्या सरकारातले वाहतूक मंत्री ए. के. श्रीधरन यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांना काही सरकारी कामासाठी फोन करणार्‍या महिलेशी ते द्वयार्थी पण असभ्यपणे बोलले असा त्यांच्यावर आरोप आहे. या संवादाची ध्वनिफीत एका स्थानिक वृत्त वाहिनीवर वाजवण्यात आली आणि त्यामुळे खळबळ माजली. या संबंधात ते ज्या महिलेशी बोलले असा आरोप आहे तिची काहीच तक्रार नाही. पण आपल्यावरचा हा माध्यमांत आलेला आरोप खोटा आहे आणि तो तसा सिद्ध होईपर्यंत आपण पदावर राहणार नाही असा पवित्रा घेऊन श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डाव्या आघाडीच्या सरकारमध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत.

अशा प्रकारात या दोघांत झालेला संवाद मुळात कोणी आणि का रेकॉर्ड केला असेल याचीही चौकशी झाली पाहिजे. पण सदर महिलेची काही तक्रार नसतानाही श्रीधरन यांनी राजीनामा दिला आहे हे विशेष आहे. पिनाराई विजयन यांच्या जून २०१६ मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारला बसलेला हा दुसरा धक्का आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतर चार महिन्यांनी या मंत्रिमंडळातले क्रीडा आणि उद्योग मंत्री इ.पी. जयराज यांना वशिलेबाजी केल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला होता. जयराज हे कुन्नुर जिल्ह्यातले असून ते मुख्यमंत्र्याचे फार निकटचे सहकारी मानले जातात. पण त्यांनी उद्योग मंत्री या नात्याने आपल्या अखत्यारीतल्या एका महामंडळावर आपल्या भाच्याची चेअरमन म्हणून वर्णी लावली. ती लावताना त्यांनी सरकारला तर विश्‍वासात घेतलेच नाही पण मुख्यमंत्र्यांनाही पूर्वकल्पना दिली नाही.

त्यापूर्वी त्यांनी आपल्या भावाच्या मेव्हणीला असेच चनरल मॅनेजर म्हणून नेमले होते. पण त्याचा बभ्रा झाला. त्यावर तिने राजीनामा दिला. भाच्याच्या नेमणुकीवर फारच आरडा ओरडा झाला. मुख्यमंत्रीही नाराज झाले. त्यांनी जयराज यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. काल राजीनामा दिलेले श्रीधरन यांनी तर कोणी सूचना केेली नसतानाही राजीनामा दिला आहे. डाव्या आघाडीचे हे सरकार पूर्वीच्या कॉंग्रेसच्या सरकारातीला भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणून स्वच्छ कारभाराची ग्वाही देऊन सत्तेवर आले आहे. आता कॉंग्रेसचे नेते या डाव्या सरकारच्या छोट्या मोठ्या गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट करायला टपलेेलेच आहे. ते अशी संधी सोडणार नाहीत त्यामुळे पिनाराई विजयन यांची मोठी पंचाईत झाली आहे.

Leave a Comment