केजरीवाल अडचणीत


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची बदनामी करण्याच्या संदर्भात खटला भरला जावा असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात त्यांना आता खटल्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे ते मोठ्या अडचणीत आले आहेत. आपल्या देशामध्ये राजकीय नेत्यांवर अनेक प्रकारचे खटले भरलेले असतात. त्यांच्या विविध पातळीवरच्या न्यायालयांमध्ये सुनावण्या सुरू असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे निर्णय नित्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द होत असतात. अशा खटल्यांमध्ये न्यायाच्या आणि कायद्याच्या संबंधातले इतके किचकट मुद्दे समोर आलेले असतात की त्या खटल्यांमध्ये नेमके काय चाललेले आहे हे सामान्य माणसाला कळत नाही.

परंतु अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील या खटल्यामध्ये ते इतके अडचणीत आलेले आहेत की एक दिवस त्यांना या खटल्यात शिक्षा होऊन कारागृहात जावे लागणार आहे. कारण त्यांनी कसलेही पुरावे उपलब्ध नसताना अरुण जेटली यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केजरीवाल यांना ही सवयच जडलेली आहे. उठसूठ कोणाचीही बदनामी करायची ही त्यांना खोडच आहे. मात्र त्यांनी बदनामी केली तरी त्यांच्यावर खटला भरण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे ते चेकाळल्यागत बालीशपणाने कोणावरही आरोप करत सुटतात. मात्र अरुण जेटली यांनी त्यांना सोडले नाही कारण अरुण जेटली यांची केजरीवाल यांनी केलेली बदनामी गंभीर स्वरूपाची, निराधार आणि बालीशपणाची होती.

या संबंधात खटला उभा राहिला तर आपल्याला नक्की शिक्षा होणार हे केजरीवाल यांच्या लक्षात यायला लागले आणि त्यांनी हर प्रकारे प्रयत्न करून हा खटलाच उभा राहू नये यासाठी बराच आटापिटा केला. त्यांनी हायकोर्टात अर्ज करून कोणीही कोणाविरुध्द काहीही बोलले किंवा लिहिले तरी त्याच्यावर खटला भरण्याची तरतूदच असू नये असा एक विचित्र अर्ज केला होता. म्हणजे याच नव्हे तर कोणत्याच खटल्यात बदनामी केल्याचा आरोपच येऊ नये असा त्यांचा हा प्रयत्न होता. मात्र तो फसला. शेवटी त्यांनी राम जेठमलानी यांना वकील म्हणून नेमले आणि जेठमलानी यांनी आपली सगळी वकिली बुध्दी पणाला लावून, अरुण जेटली यांची बरीच उलटतपासणी केली. अरुण जेटली यांना आपली बदनामी झाली आहे असे वाटत असेल तर त्यांनी ती कुठे झाली हे दाखवून द्यावे आणि सिध्द करावे असा या बदनामीच्या कलमाच्या मुळालाच हात घातला पण तोही फसला. आता अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शेवटी अरुण जेटली हेसुध्दा नावाजलेले वकील आहेत.

Leave a Comment