राष्ट्रपती निवडणूक आणि स्नेहभोजन


विधानपरिषदेच्या पाच राज्यातल्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि दुसर्‍या फेरीला अजून सात-आठ महिने आहेत. त्यामुळे आता नजिकच्या काळामध्ये होणारी राष्ट्रपतीची निवडणूक गाजायला लागली आहे. भारतीय जनता पार्टीला आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेले मतांचे बळ जमवता आलेले नाही. साधारणतः तीन महिन्यापूर्वी या संबंधात जेव्हा गणिते मांडली गेली होती तेव्हा भाजपा या गणितापासून खूप खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले होते. म्हणजे भाजपाला स्वतःच्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी कमीत कमी दोन किंवा तीन पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल आणि पूर्णपणे स्वतःच्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणता येणार नाही असे त्या गणितांमध्ये मांडण्यात आले होते. परंतु राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे गणित सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाचे निकाल लागल्यानंतर या चर्चेला वेगळेच वळण लागले. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पध्दतीत उत्तर प्रदेशच्या प्रत्येक आमदाराच्या मताला राज्याच्या मोठ्या लोकसंख्येमुळे मोठे मूल्य आहे.

असे मोठे मूल्य असलेल्या राज्यात भाजपाचे तब्बल ३२५ आमदार निवडून आल्यामुळे सारे गणित बदलले. भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत म्हणावी एवढी हीनदीन राहिलेली नाही. परंतु अजूनही भाजपाला पूर्णपणे स्वबळावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणता येणार नाही. मात्र दोन ते तीन पक्षांच्या नाकदुर्‍या काढण्यापेक्षा फार तर एखाद्या पक्षाची मदत घ्यावी लागेल असे दिसायला लागले आणि असा पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेने सहकार्य केले नाही तर भाजपाला या निवडणुकीत फार काही नुकसान सहन करावे लागणार नाही. परंतु जी २० हजार मते कमी पडतात ती शिवसेना त्यांना देऊ शकते. ६० आमदार आणि १९ खासदार एवढी शक्ती असलेला एकच पक्ष कच्छपी लावला की भाजपाची राष्ट्रपती निवडणुकीची परीक्षा सहजपणे पार पाडली जाते. म्हणजे पूर्वी दोन किंवा तीन पक्षांची मदत घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली जात होती ती आता एका पक्षावर आलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेवर लक्ष केंद्रित केले आहे. निदान राजकीय वर्तुळात तशी चर्चा तरी सुरू झालेली आहे. भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने हे गणित अजून जाहीरपणे मांडलेले नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए आघाडीतील घटक पक्षांना गुढी पाडव्याच्या निमित्ताने भोजनाचे निमंत्रण दिले आहे. तेवढ्या सुतावरून काही माध्यमे स्वर्गाला जायला लागली आहेत.

हे स्नेहभोजन म्हणजे शिवसेनेचे लांगुलचालन करण्याचाच प्रकार आहे, असे पत्रकारांनीही म्हणायला सुरूवात केली आहे आणि तेवढ्याच आधारावर शिवसेनेचे नेतेसुध्दा फुरफुरायला लागले आहेत. एनडीए आघाडीत आपण मोठा घटक पक्ष आहोत, महाराष्ट्रात तर आपण मोठा भाऊ आहोत. त्यामुळे आपल्याला पुरेसा मान मिळाला पाहिजे एवढ्यासाठी शिवसेनेचे नेते एवढे आसुसलेले आणि अधीर झालेले आहेत की तशी शक्यता हवेत निर्माण झाली तरी ते तेवढ्या दूरस्थ शक्यतेच्या जोरावर दंडातल्या बेंडकुळ्या फुगवायला लागतात. नरेंद्र मोदी यांच्या भोजनाचे निमंत्रण राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आहे असे मोदींनी कुठेच म्हटलेले नाही. परंतु पत्रकारांनी व्यक्त केलेल्या तशा शक्यतांच्या आधारावर शिवसेनेच्या नेत्यांनी, राष्ट्रपती पदाच्या निवडीची चर्चा मातोश्रीवरच होईल असा अनाठायी वल्गना करायला सुरूवात केली आहे. यातला बालिशपणा आणि मोठ्या भावाच्या वागणुकीची तीव्र इच्छा या लपून रहात नाहीत. मात्र शिवसेनेची वल्गनाबाजी काही कमी होत नाही.

शिवसेनेच्या नेत्यांनी असा पोरकटपणा करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असावेत असेही जाहीर करून टाकले आहे. खरे म्हणजे शिवसेना हा एनडीए आघाडीतला किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला केवळ पासंगाचे महत्त्व असलेला घटक आहे. त्यांना उमेदवार जाहीर करण्याचा आधिकारही नाही आणि त्यांना तसे कोणी विचारलेलेही नाही. परंतु देव भाजपाच्या आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांना सद्बुध्दी देवो आणि डॉ. मोहन भागवत हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार न होवोत अशीच प्रार्थना आम्ही करतो. कारण डॉ. मोहन भागवत यांच्याकडे राष्ट्रपती होण्याइतकी परिपक्वता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा निर्णय फार सखोल विचार करून आणि परिपक्वतेने घेतील या विषयी आम्हाला खात्री आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेसारखाच उतावीळपणा करून ममता बॅनर्जी यांनीही त्यांना कोणीही विचारलेलेही नसताना लालकृष्ण अडवाणी असतील तर त्यांना आपण पाठिंबा देऊ असे आगावूच जाहीर करून टाकले आहे. ममता दिदींची दुसरी पसंती प्रणव मुखर्जी यांना असणार आहे. अर्थात त्यांच्या पसंतीलाही तसे काहीच महत्त्व नाही. एकंदरीत जेवणाचे अद्यापही न मिळालेले निमंत्रण आणि न सुरू झालेली राष्ट्रपती पदाची चर्चा स्वतःच घडवून आणून शिवसेना हास्यास्पदपणे आपले महत्त्व वाढवण्याची कोशिश करत आहे.

Leave a Comment