डास प्रतिबंधक वनस्पती


कर्नाटकाच्या आरोग्य खात्याने डासांपासून प्रसारित होणार्‍या मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यू या विकारांवर एक साधा पण रामबाण उपाय शोधला असून तो राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या काही संशोधन संस्थांनी डासांचा प्रतिबंध करण्यासाठी काही वनस्पतींचा वापर करता येऊ शकतो असा दावा केला. या वनस्पती किंवा झाडांचा सुगंध हवेत दरवळला की डास पळून जातात किंवा मरतात असा याा संशोधनाचा दावा आहे. झेंडू, तुळस, लव्हेंडर, निरगुंडी, लेमन ग्रास अशा या वनस्पती असून त्यांची लागवड आपल्या घराच्या आसपास केल्यास डासांचा प्रतिबंध आपोआपच होतो. म्हणून या सर्व झाडांची रोपे किंवा बिया राज्यभर मोफत वाटण्याची योजना सरकारच्या आरोग्य खात्याने आखली आहे.

अशा एकूण १४ वनस्पती असून त्यांच्या वाटपासाठी ६ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. या वनस्पतींमध्ये तुळशीचे झाड तर सर्वांना माहीतच आहे. परंतु तुळशीचा असाही उपयोग होऊ शकतो हे लोकांना माहीत नाही. कर्नाटक सरकारच्या आयुष मंत्रालयाचे उप संचालक थिम्मप्पा शेट्टीगर यांनी राज्यात दीड लाख रोपे वाटण्याची घोषणा केली आहे. त्यातील निरगुंडीच्या झाडांचा डास प्रतिबंधक उपयोग अधिक व्यापक असल्याचे थिम्मप्पा यांनी सांगितले.

राज्य सरकार असा दावा करत असतानाच शास्त्रज्ञांनी मात्र या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसिज कंट्रोल प्रोगॅम या कार्यक्रमाचे शास्त्रज्ञ या १४ वनस्पतींच्या वासाने किंवा दरवळाने डास पळून जातात हे मानण्यास तयार नाहीत. त्यांच्या मते या वनस्पतींच्या फुलांचा किंवा पानांचा अर्क काढला तरच त्याच्या उर्ग दर्पाने किंवा त्याच्या धुराने डास पळून जाऊ शकतात. निव्वळ झाडाची लागवड केल्यामुळे डास कमी होतील हे म्हणणे मान्य करण्यास शास्त्रज्ञ तयार नाहीत. मात्र सरकारचा कार्यक्रम निश्‍चितपणे राबवला जाणार आहे.

Leave a Comment