नवी दिल्ली: सर्व बँका आर्थिक वर्ष २०१६-१७ ला निरोप देण्यासाठी कामाला लागल्या असून देशाचे अर्थमंत्रालयही जोरदार कार्यरत आहे. त्यामुळे वर्षपूर्ती होत असताना देशभरातून जमा होणाऱ्या महसुलावर डोळा ठेवत जास्तीत जास्त महसुल पदरात पाडून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेने (आरबीआय) या प्रयत्नाचाच भाग म्हणून २५ मार्च ते १ एप्रिल पर्यंत कार्यरत राहण्याच्या सुचना देशभरातील बँकांना दिल्या आहेत. याचाच अर्थ असा की २५ मार्च ते १ एप्रिल या काळात सर्व बँका सुरू राहणार आहेत. या काळात बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येणार नाही. अगदी शनिवार, रविवारीसुद्धा.
एक एप्रिलपर्यंत बँकांना शनिवार, रविवारीही सुट्टी नाही
बँकांचे व्यवहार २५ मार्च ते १ एप्रिल या काळात दैनंदिन पद्धतीनेच होतील. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय काहीसा ताण वाढवणारा असला तरी, सर्वसामान्यांना मात्र याचा चांगलाच फायदा होणार आहे. तुमचेही काही आर्थिक महत्त्वाचे काम असले तर, तुम्हालाही या कालावधीत तुमची आर्थिक कामे निपटता येणार आहेत. विशेष म्हणजे आरबीआयने सरकारी बँकांसोबतच काही खासगी बँकांनाही याबाबत आदेश दिले असून, सुट्टी न घेता काम करण्याच्या सुचना केल्या आहेत. एक पत्रकाद्वारे आरबीआयने ही माहिती दिली आहे.