रिलायन्स वाढवणार जिओची प्राईम मेंबरशीप घेण्याची मुदत?


मुंबई : ३१ मार्चला रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईयर ऑफर संपणार आहे. त्यानंतरही कमी पैशात अनलिमिटेड ४जी डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगचा लाभ घ्यायचा असेल, तर रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. ३१ मार्चपर्यंत ही मेंबरशीप घेता येईल.

दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ३१ मार्चवरुन ३० एप्रिलपर्यंत प्राईम मेंबरशीपची मुदत वाढवली जाऊ शकते. प्राईम मेंबरशीप ऑफरमध्ये जिओने अपेक्षित ग्राहकांपैकी ५० टक्के ग्राहक मिळवल्याची माहिती आहे. त्यामुळे ही ऑफर आणखी वाढवली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

जिओने गेल्या महिन्यातच १० कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला आहे. त्यानंतर प्राईम मेंबरशीप या नव्या ऑफरची घोषणा करण्यात आली होती. ९९ रुपयांची प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर ३०३ रुपये प्रति महिना दराने ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ एक वर्षासाठी म्हणजे १ एप्रिल २०१८ पर्यंत घेता येईल. ३१ डिसेंबरला ‘वेलकम ऑफर’ संपल्यानंतर १ जानेवारीपासून ‘हॅप्पी न्यू ईयर’ ही ऑफर लाँच करण्यात आली होती. ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरनुसार सध्या ग्राहकांना ३१ मार्च पर्यंत प्रति दिन १जीबी डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे.

१ मार्च ते ३१ मार्च या काळात प्राईम मेंबरशीपसाठी नोंदणी करता येईल. मात्र मेंबरशीप न घेतल्यास तुमचे जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावे लागेल. सप्टेंबर २०१६ मध्ये जिओने टेरिफ प्लॅन लाँच केले होते. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल, केवळ डेटाचे पैसे मोजावे लागतील.

सध्याच्या १० कोटी ग्राहकांना आणि ३१ मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना जिओच्या प्राईम मेंबरशीपचा लाभ मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया १ मार्चला सुरु करण्यात आली, तर ३१ मार्च अंतिम तारीख असेल. प्राईम मेंबरशीपसाठी जिओ युझरला ९९ रुपये मोजावे लागतील, तर एक वर्षासाठी ही मेंबरशिप असेल. प्राईम मेंबरशीप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितले. मेंबरशीप घेतल्यास ३०३ रुपये प्रतिमहिना दराने ३१ मार्च २०१८ पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (१जीबी प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन १० रुपये खर्च येणार आहे.

Leave a Comment