आधार शिवाय मिळणार नाही मोबाईल


मुंबई – आयकर भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर आता मोबाईल घेतानाही तुम्हाला आधार नंबर अनिवार्य करण्याची तयारी सुरु असून वर्षभरात ग्राहकांचे मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डशी जोडले जावेत असे आदेश दूरसंचार विभागाने कंपन्यांना दिले आहेत.

आधार सलग्न करण्याची प्रक्रिया ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पूर्ण व्हायला हवी. या मुदतीनंतरही ज्या मोबाईल ग्राहकांनी आधार जोडणी केली नसेल त्यांच्या मोबाईलची सुविधा बंद होण्याचीही शक्यता आहे. त्यामूळे लवकरच सर्व मोबाईल्सना आधार कार्डशी जोडले जाणार आहे. सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांची पुन्हा पडताळणी करणार आहेत. यामध्ये प्रिपेड आणि पोस्टपेड यूजर्स सहभागी असतील. यांची पडताळणी आधार कार्डवर आधारित E-KYC पद्धतीने केली जाईल.

सर्व मोबाईल ग्राहकांची कागदपत्र पडताळणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुन्हा होणार असून यासंबधीचे मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचवा असे आदेश मंत्रालयाने सर्व कंपन्यांना दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एक वर्ष जाऊ शकेल. याव्यतिरिक्त प्रीपेड कार्ड्सना विना आधार कार्ड किंवा विना ओळखपत्राशिवाय रीचार्ज केले जाणार नसल्याचे एटोर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले.

टेलीकॉम कंपनी आपल्या ग्राहकांच्या मोबाईलवर वेरिफिकेशन कोड पाठवेल. सिमकार्डधारक उपलब्ध असल्यावर E-KYC प्रोसेस सुरु करण्यात येईल.

Leave a Comment