हा तर कलंक


आपल्या देशात खासदारांना लॉ मेकर्स असे म्हटले जाते. कारण देशातले कायदे तयार करणे हे त्यांचे काम आहे. देशात आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांची नेेमकी कर्तव्ये काय आहेत आणि त्यांना नेमके कशासाठी निवडून द्यायचे असते याबाबत जनताही अंधारात आहे आणि ज्यांना निवडून दिले जाते ते प्रतिनिधीसुध्दा आपले नेमके कर्तव्य जाणत नाहीत. लोकांची बेकायदा कामे राजधानीतून करून देणे. सरकारी कार्यालयातील त्यांचे कागद पुढे सरकतील यासाठी मंत्रालयात प्रयत्न करणे, लोकांच्या पोराबाळांना पोलिसातून सोडवून आणणे, खंडण्या वसूल करणे आणि यातूनही वेळ मिळाला तर विधानसभेत किंवा संसदेत जाऊन गोंधळ घालणे हेच आपले काम आहे असा आमदार-खासदारांचा समज आहे. वास्तविक ते कायदे मंडळाचे सदस्य असतात आणि देशातले कायदे तयार करणे, ते दुरूस्त करणे हे त्यांचे कर्तव्य असते. परंतु कायद्याविषयी असलेले आपले कर्तव्यच त्यांना माहीत नाही आणि आपण कायदा तयार करणारे आहोत हे माहीत नसल्यामुळे आपण कायदा मोडता कामा नये याचीही त्यांना जाणीव नाही.

उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल आपण आपल्या कर्तव्याचे विस्मरण होऊन किती बेभान होऊन वागू शकतो, किती असभ्यपणे वागून सार्वजनिक ठिकाणी राडा करू शकतो याचे बिभत्स दर्शन घडवले. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे म्हणजे वरच्या दर्जाचे तिकिट होते. त्या वरच्या दर्जाच्या इतमामाने प्रवास करणे हा त्यांचा हक्क होता. परंतु ते ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानात वरच्या दर्जाने प्रवास करण्याची सोयच नव्हती. त्यामुळे त्यांना साध्या क्लासने प्रवास करावा लागला. त्यांना नेहमीच असा खालच्या क्लासने प्रवास करावा लागतो. त्यामुळे ते चिडले होते. त्यांचा हा खालच्या क्लासचा प्रवास दिल्लीला संपला आणि तिथे त्यांचा रागाचा उद्रेक झाला. आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी त्या विमानातून खाली उतरण्यास नकार दिला आणि त्यांना समजवावयास गेलेल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तिथे या दोघांमध्ये अरे-तुरे सुरू झाले आणि रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकार्‍याला पायातील सँडल काढून त्याला मारले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि शिवसेनेच्या खासदाराच्या वर्तनाबद्दल सर्वत्र निषेधाची प्रतिक्रिया उमटली आहे.

खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर अन्याय झाला आहे असे वादासाठी गृहित धरले तरी या देशातले खासदार आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी अधिकार्‍यांना पायताणाने मारत असतील तर त्यांचे हे वर्तन रानटीपणाचे मानावे लागेल. अन्यायाचे निवारण करण्याचा खासदारांचा हा मार्ग जनतेला काय धडा शिकवणार आहे? पुढे चालून त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांना खासदारांनी आपल्यावर अन्याय केला आहे असे वाटले तर त्यांनी खासदाराकडून झालेल्या अन्यायाचे निवारण असेच करून घ्यावे का? त्यावेळी नागरिकांनी खासदारांनी पूजा पायताणाने केली तर खासदारांना ते चालेल का? मुळात बिझनेस क्लासने प्रवास करण्याचा पास असताना ते तशी सोय नसलेल्या विमानातून प्रवास करून गेले ही त्यांची चूकच आहे. ज्या विमानात त्या क्लासने प्रवास करण्याची सोयच नाही तिथे त्या क्लासनेच प्रवास करण्याचा हट्ट धरणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे. त्यांना वारंवार असा प्रवास करावा लागतो. हे जर डाचत असेल तर हवाई वाहतूक खाते, विमान कंपनी, लोकसभेच्या सभापती या पैकी कोणाकडेही तक्रार करून ते आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागू शकतात. परंतु हे सगळे वैध मार्ग सोडून परत जाणार्‍या विमानात गांधीगिरीचा फालतू तमाशा करणे हे काही योग्य नाही.

मुळात आमच्या सारख्या सामान्य लोकांना एक प्रश्‍न पडलेला आहे की, बिझनेस क्लासचा पास असतानाही इकॉनॉमी क्लासने प्रवास करावा लागणे हा किती मोठा अन्याय आहे. इकॉनॉमी क्लासने प्रवास केल्याने काय बिघडते? उलट राजकीय पक्षाचे नेते रेल्वेतून सामान्य डब्यातून प्रवास करण्याचे नाटक अधूनमधून करतच असतात आणि राहुल गांधी वगैरे मंडळी असा प्रवास करतात तेव्हा त्यांचे कौतुकही केले जाते. सामान्य माणसात अशा प्रकारे मिसळून त्यांची दुःखे जाणून घेतली म्हणून त्यांना वेगळी प्रसिध्दीही मिळते. मग प्राध्यापक रवी गायकवाड यांना सामान्य प्रवाशाच्या बाजूला बसून प्रवास करावा लागला तर त्यात एवढी चीड येण्यासारखे काय आहे? एकंदर सारा प्रकार शिवसेना स्टाईल झालेला आहे. शिवसेनेने मराठी माणसाचा स्वाभिमान चुकीच्या मार्गाने जागृत केलेला आहे. त्यामुळे अरेरावी करणे, मोठ्या आवाजात बोलणे, शिवीगाळ करणे, हल्ले करणे हे सारे प्रकार म्हणजे मराठी बाण्याचेच आहेत असा एक सूक्ष्म गैरसमज शिवसैनिकांच्या मनात जागा केलेला असतो. उध्दव ठाकरे वगैरे शिवसेनेचे नेते ऐतिहासिक नाटकातील पात्रांच्या आविर्भावातच सतत बोलत असतात. खरे म्हणजे हे काही मराठीपणाचे लक्षण नाही. पण तेवढा िवचार कधी केला जात नाही आणि त्यातून असे राडे होतात.

Leave a Comment