शशिकला यांची परीक्षा


तामिळनाडूचा कारभार तुरुंगातून पहात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या लोकप्रियतेची पहिली आणि निर्णायक परीक्षा येत्या १२ एप्रिलला होणार आहे. चेन्नई शहरातील आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक त्या दिवशी होणार आहे. या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाचे दोनही गट स्वतंत्रपणे उतरलेले आहेत. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अण्णा द्रमुक पक्षातील फूट अधिकृत झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या दोन्ही गटांना वेगळी नावे दिली आहेत. पक्षाचे ऑल इंडिया अण्णा द्रमुक हे नाव गोठवण्यात आले आहे. शशिकला यांच्या गटाला किंवा पनीरसेल्वम यांच्या गटाला हे नाव असेच वापरता येणार नाही. शशिकला यांच्या गटाला दिलेल्या पक्षाच्या नावात मुळातल्या नावाच्या पुढे (अम्मा) असे शेपूट जोडले जाईल.

पनीरसेल्वम यांच्या गटाला पूर्वीचेच नाव मात्र (पुराची थलवाई अम्मा) असे शेपूट जोडून वापरता येईल. पक्षाचे दोन पाने हे चिन्हही गोठवण्यात आले आहे. शशिकला गटाला आता हॅट हे चिन्ह देण्यात आले आहे तर पनीरसेल्वम गटाला विजेचा खांब हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आता अण्णा द्रमुकचे हे दोन गट वेगळी नावे आणि वेगळी चिन्हे धारण करून पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. शशिकला या जयललिता यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यामुळे त्यांना जयललितांच्या मालमत्तेसह पक्ष ताब्यात घेणे सोपे झाले. मात्र त्यांचा पक्षावरचा हा ताबा जनतेला पसंत आहे की नाही याची परीक्षा आर. के. नगरच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. या पोटनिवडणुकीत शशिकला गटाला जास्त मते मिळाली तर जनतेला त्या जयललिताच्या वारस म्हणून मान्य आहेत असे समजले जाईल.

या दोन्ही गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शशिकला यांनी आपल्या गटाचा उमेदवार म्हणून आपला पुतण्या ई मधुसुदनन याला उभे केलेले आहे. तो शशिकला यांचा पुतण्या आहे. तो विजयी झाल्यास शशिकला यांचा तर तो विजय ठरेलच पण त्यांच्या गटातसुध्दा एक स्पर्धा सुरू आहे. शशिकला यांनीच घोड्यावर बसवलेले सध्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हे उद्या चालून शशिकला यांना डोईजड होतील अशी भीती शशिकला यांना वाटते. तेव्हा मधुसुदनन विजयी झाला तर कदाचित शशिकला त्याला मुख्यमंत्रीसुध्दा करू शकतील आणि तुरुंगातून निश्‍चिंत मनाने राज्य कारभार करू शकतील.

Leave a Comment