ब्रह्मपुत्रेतील निसर्गसुंदर माजुली बेट


आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत वसलेले माजुली बेट हे अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्य, हिरवी गार भातशेती, येथील आदिवासी रहिवासी, स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर, सांस्कृतिक वारसा जपणारे ठिकाण अशा अनेक कारणांनी हे बेट ओळखले जाते. विशेष म्हणजे एकेकाळी जगातील सर्वात मोठे नदीतील बेट अशी त्याची ओळख होती. त्यावेळी या बेटाचा परिसर १२५० चौरस किलोमीटरचा होता. मात्र ब्रह्मपुत्रेच्या वेळोवेळी पात्र बदलण्यामुळे या बेटाचा बराचसा भाग नदीत बुडला असून आता ४०० चौरस किलोमीटरचा भाग शिल्लक राहिला आहे. आजही पावसाळ्यात हे बेट नदीच्या पुरात बुडते.


भारतातील सुंदर पर्यटनस्थळांपैकी माजुली एक असले तरी येथे पर्यटकांसाठी खास सोयी नाहीत. चांगली हॉटेल्स नाहीत मात्र पूर्वकल्पना दिली असेल तर येथे होम स्टेची सुविधा मिळू शकते. स्थलांतरीत पक्ष्यांचे हे माहेरघर. अ्रनेक प्रकारचे पक्षी येथे पाहता येतात व त्यामुळे पक्षी निरीक्षकांचे ते आवडते स्थळ आहे. जानेवारी ते मार्च हा त्यासाठी उत्तम काळ. सुमारे दीड लाख लोकसंख्येचे हे बेट. येथे बहुतांशी आदिवासी जमातीच आहेत. आपला सांस्कृतिक वारसा त्यांनी फार चांगल्या प्रकारे जपला आहे. शेती हा येथला मुख्य व्यवसाय असून येथे खते व किटकनाशके न वापरता सुमारे १०० प्रकारच्या तांदळाचे उत्पादन होते.


येथील हातमागावरील विणकाम फारच प्रसिद्ध असून जगप्रसिद्ध मुंगा सिल्कपासून येथे अनेक कपडे बनविले जातात. मातीची सुंदर घटांची भाजून बनविलेली भांडी हेही येथील एक वैशिष्ठ. या भांड्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आहे. नोव्हेंबरमध्ये येथे साजरा होत असलेला रास फेस्टीव्हल हा तीन दिवसांचा उत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या उत्सवात या बेटावरील एकूणएक नागरिक भाग घेतात. श्रीकृष्णाचा हा उत्सव कार्तिकी पर्णिमेला साजरा होतो. या उत्सवासाठी फारच अप्रतिम मुखवटे बनविले जातात त्यानंतर बोटींची रेस होते.हा काळही या बेटाला भेट देण्यासाठी चांगला असतो.

Leave a Comment