आयसीआयसीआयचे ग्रामीण भागासाठी मेरा आय मोबाईल अॅप


खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक आयसीआयसीआयने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी १३५ प्रकारच्या विविध सेवा देणारे व ११ भाषांतून वापरता येईल असे एक खास अॅप मेरा आय मोबाईल अॅप नावाने लाँच केले आहे. विशेष म्हणजे आयसीआयसीआयच्या ग्राहकांबरोबरच बँकेचे ग्राहक नसलेले नागरिकही हे अॅप डाऊनलोड करून ही सेवा घेऊ शकणार आहेत.

या अॅपद्वारे दिल्या जाणार्‍या सेवांमध्ये कृषी संबंधी सेवा, बँक सेवा, किसान क्रेडीट कार्ड, गोल्ड लोन, कृषी अवजारे कर्ज, स्वबचत गटांसाठी कर्जे अशा १३५ प्रकारच्या विविध सेवा असून फोनवरून इंटरनेटशिवाय या सेवा मिळू शकणार आहेत. शेती सूचना, देशाच्या विविध ४३० मंडयातील २३० शेतमालाचे भाव ३०० जिल्ह्यातील ३७०० तालुक्यांचे तालुकावार हवामान, पेरणी, कापणी संदर्भातल्या सूचना देणारे हे पहिलेच बँक अॅप असल्याचे बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांनी सांगितले.त्या म्हणाल्या ग्रामीण तसेच निमशहरी ग्राहकांना नजरेसमोर ठेवून हे अॅप तयार केले असून हिंदी, मराठी, गुजराथी, तमीळ, तेलगू, मल्याळी, कन्नड, बंगाली, उरीया, आसामी व पंजाबी अशा ११ भारतीय भाषात ते उपलब्ध आहे.

Leave a Comment