‘वेटिंग लिस्ट’च्या कटकटीतून होणार सुटका


नवी दिल्ली : रेल्वेच्या वेटिंग लिस्टमुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होतो. त्यामुळे या वेटिंगच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी नवीन घोषणा करण्यात आली. नव्या आरक्षण योजनेची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. आता १ एप्रिलपासून या आरक्षण योजनेनुसार प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना पुढील ट्रेनमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेनुसार प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेनमधून कोणतीही अधिक किंमत न मोजता प्रवास करता येणार आहे.

ही घोषणा करताना सुरेश प्रभूंनी विकल्प योजनेची माहिती दिली. यासाठी प्रवाशांना पर्याय निवडावा लागणार आहे. जर हव्या त्या ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये आसन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र सध्याच्या ट्रेनमधील प्रवाशांची यादी निश्चित झाल्यावरच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडता येईल. सुरुवातीला ‘विकल्प’ हा पर्याय फक्त ई-तिकीट असलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल.

हा विकल्प निवडणा-या प्रवाशाने दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार देत तिकीट रद्द केल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी निश्चित होताच प्रवाशांना तिकीटाची रक्कम परत केली जाणार नाही. ट्रेन सुटण्याच्या ४ ते १२ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेतील ५०% रक्कम कापण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू क्षेत्रात विकल्प योजना प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती. राजधानी, शताब्दी ट्रेनमधील आसने रिक्त राहू नयेत, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या ट्रेन्समधील सरासरी १२% आसने रिक्त राहात असल्याने या योजनेची सुरुवात करण्यात आली.

Leave a Comment