२ हजारांनी कमी होणार गृह कर्जाचे हप्ते


नवी दिल्ली: शहरी भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १२ ते १८ लाखांपर्यंत किंमतीचे नवीन घर खरेदी केल्यास त्यावरील व्याज तब्बल २ हजारांनी कमी होणार आहे. तर ९ ते १२ लाख किंमतीच्या घर खरेदीवर ३ ते ४ टक्के व्याज आकारला जाईल. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर गृह व्याज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. ७० कर्जपुरवठा संस्था, ४५ हाऊसिंग फायनान्स कंपनी, १५ शेड्युल बँका, प्रादेशिक ग्रामीण आणि सहकारी बँका इत्यादींनी केंद्राच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी फायदेशीर ठरणारी केंद्र सरकारची गृहकर्ज व्याज सवलत योजना १ जानेवारीपासूनच्या कर्जांवर लागू केली जाणार आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून गृह कर्ज घेतलेल्यांनाच याचा फायदा मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी ३१ डिसेंबर २०१६ रोजी गृहकर्ज व्याज सवलत योजनेची घोषणा केली होती. ज्यांनी १ जानेवारीआधी कर्जासाठी अर्ज केला आहे, मात्र १ जानेवारीनंतर कर्ज झाले आहे, तेही केंद्राच्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. कर्जावरील व्याजात ४ टक्के सवलत मिळाल्यानंतर ९ लाखांवरील व्याज महिन्याला थेट २,०६२ रुपयांनी कमी होईल, तर १२ लाखांवरील व्याज २,०१९ रुपयांनी कमी होईल, असे नॅशनल हाऊसिंग बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीराम कल्याणरामन यांनी सांगितले.