योगीजींचा दणका


एखाद्या नेत्याला समाजातला कोणता प्रश्‍न फार सतावत असतो हे त्याच्या अनुभवावरून आणि त्याच्यावर झालेल्या संस्कारातून कळत असते. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेची सूत्रे हाती घेताच सगळ्या पोलीस अधिकार्‍यांना पाचारण केले आणि मुलींचे शाळा महाविद्यालयात जाणे निर्धोक करण्याचा त्यांना आदेश दिला. कारण उत्तर प्रदेशातल्या अनेक मुली शाळा आणि महाविद्यालयात जाताना होणार्‍या टवाळीने आणि छेडाछेडीने त्रस्त होऊन शिक्षण सोडून देतात. योगींचा हा अनुभव होता आणि त्यापायी ते अस्वस्थ होते. त्यांनी पोलिसांना सांगून अँडी रोमियो पथके तयार करायला सांगितले आणि अशा पथकांचा पहारा शैक्षणिक संस्थांच्या परिसरात बसवावा असा आदेश दिला.

आता पोलिसांनी लखनौ परीक्षेत्रात येणार्‍या अकरा जिल्ह्यात अशी पथके तयार केली आहेत. खरे तर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातही हा प्रश्‍न फार चर्चिला गेला आहे पण महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत काही मोठी मोहीम काढली नाही आणि कसली स्वतंत्र यंत्रणाही निर्माण केली नाही. २०१२ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे औरंगाबादेत युवती मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात या युवतींना अस्वस्थ करणार्‍या समस्या कोणत्या यावर चर्चा झाली तेव्हा असे दिसून आले की, हुंडा आणि छेडाछेडी या दोन समस्या फार ज्चलंत आहेत. याच कार्यक्रमात तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अशी माहिती दिली होती की, त्या पूर्वीच्या वर्षात छेडाछेडीला कंटाळून राज्यात एक हजार ५६ मुलींनी आत्महत्या केल्या होत्या.

या प्रकाराने मरणार्‍या मुलींची ही संख्या पाहिली म्हणजे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या इतकीच हीही समस्या गंभीर असल्याचे दिसते. पण तिच्यावर आपण चर्चा करीत नाही आणि सरकारही काही उपाय योजना करीत नाही. ही तर आत्महत्या करणार्‍या मुलींची संख्या आहे पण छेडछाड असह्य होऊन शिक्षण थांबवणार्‍या किती तरी मुली या समाजात आहेत. उत्तर प्रदेशातही ही समस्या इतकीच गंभीर आहे. पण समाजाच्या तळागाळातल्या लोकांना आणि सामान्य माणसांंना सतावणारे हे प्रश्‍न आपल्या कोट्यधीश आमदार खासदारांना तेवढे गंभीर वाटत नाहीत. ज्या वर्गातल्या मुलींना ही समस्या सतावत असते त्याच वर्गातून पुढे आलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते तेव्हा मात्र योगी आदित्यनाथ यांनी केल्याप्रमाणे तातडीने काही कारवाई केली जाते.

Leave a Comment