भाजपाची बेरीज


विधानसभा निवडणुकीच्या नुकत्याच पार पडलेल्या फेरीनंतर आता आणखी काही राज्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन मोठी राज्ये समाविष्ट आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी कर्नाटकाची निवडणूक होईल आणि काही दिवसांनंतर महाराष्ट्रातली निवडणूक होईल. त्या अर्थाने कर्नाटकाने आता निवडणूक वर्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला मात्र अजून एक वर्ष आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खेळल्या जाणार्‍या डावपेचांची घाई महाराष्ट्रात अजून तरी सुरू नाही पण तरीही महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा नारायण राणे यांनी नाकारली असली तरी नारायण राणे नवा पक्ष शोधत असावेत असे चित्र तरी दिसत आहे. कॉंग्रेसमध्ये त्यांचे काही ठिक चाललेले नाही. त्यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

नारायण राणे हेसुध्दा अधूनमधून कॉंग्रेसमध्ये गोची होत असल्याची तक्रार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे करतच असतात. त्याच्यामुळे ते भाजपातच येतील असे आज तरी निश्‍चितपणे म्हणता येत नाही. कदाचित ते शिवसेनेतही जातील. पण येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी कॉंग्रेसला एक धक्का बसणार आहे हे निश्‍चित. तो कधी बसतो, कसा बसतो आणि त्याचा लाभ कोणाला होतो याबाबत आता काहीच सांगता येत नसले तरी राणेेंच्या रूपाने कॉंग्रेसमध्ये गळती होणार हे अधिक संभवनीय आहे. राणे यांच्या संदर्भात सुरू असलेली चर्चा कधी तरी साकार होणारच असे वाटण्यास एक कारण आहे. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्याबाबतीत गेले दोन-तीन महिने अशीच चर्चा होत आली होती. या चर्चेत कधी शक्यता व्यक्त झाली तर कधी कृष्णा यांनीच शक्यतेचा इन्कारही केला. मात्र शेवटी काल त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाच. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. एस. एम. कृष्णा यांच्या आगमनाने भाजपाला किती मोठा फायदा होईल याचे गणित आताच मांडता येत नसले तरी तो कॉंग्रेससाठी धक्का असणार आहे. कारण एखाद्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री असलेला नेता पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात दाखल होतो तेव्हा नाही म्हटले तरी जुन्या पक्षाला मानसिक का होईना पण धक्का बसतोच. सध्या कॉंग्रेसला तर अनेक धक्के बसत आहेत. त्यातच आता कृष्णा यांचा एक धक्का आहे.

एस. एम. कृष्णा यांचे भाजपामधील आगमन एका परीने नक्कीच फायदेशीर आहे. कॉंग्रेसपेक्षासुध्दा एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (से) या पक्षाला हा मोठा धक्का राहणार आहे आणि हा पक्ष भाजपाचा प्रतिस्पर्धी पक्ष असल्यामुळे त्याला बसलेला धक्का हा भाजपासाठी लाभाचा ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी कर्नाटकात लोकप्रिय असली तरी स्वतःच्या बळावर तिथे निर्विवाद बहुमत प्राप्त करता येईल एवढे तिचे वर्चस्व नाही. लिंगायत समाज आणि उत्तर कर्नाटका ही भाजपाची बलस्थाने आहेत. दक्षिण कर्नाटकात भाजपाला अजून म्हणावे तसे वर्चस्व मिळवता आलेले नाही. तिथे भाजपापेक्षाही जनता दल (से) या पक्षाची ताकद जास्त आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचा वोक्कलिग समाज ही या पक्षाची बलस्थाने आहेत. आता एस. एम. कृष्णा यांच्या भाजपातल्या प्रवेशाने दक्षिण कर्नाटकात भाजपाला स्थान मिळणार आहेच पण देवेगौडा यांना धक्का बसणार आहे. कारण एस. एम. कृष्णा हेसुध्दा वोक्कलिग समाजाचे नेते आहेत.

एस. एम. कृष्णा हे १९९९ ते २००४ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचे कर्नाटकातले मुख्यमंत्री होते. २००४ साली ते केंद्रीय मंत्रिमंडळात आले. त्यांनी केंद्रामध्ये काही खाती सांभाळली. त्यातले परराष्ट्र खाते महत्त्वाचे होते. ते मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री होते आणि त्या अर्थाने त्यांचे भाजपातले आगमन प्रतिष्ठेचे ठरणार आहे. २००९ नंतर कृष्णा यांचे केंद्रातले मंत्रिपद गेले आणि तेव्हापासून ते कॉंग्रेस पक्षात उपेक्षित राहिले आणि ती उपेक्षा असह्य झाल्यामुळेच ते आता भाजपामध्ये आले आहेत. सध्या कर्नाटकात दक्षिण भागातील नंजनगुड आणि गुंडुलपेठ या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उत्तर भारतामध्ये त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयाच्या पाठोपाठ या दोन पोटनिवडणुका होत असून त्यामुळे त्यांना महत्त्व आले आहे. उत्तर भारतात जारी असलेली मोदी लाट कर्नाटकात मौजूद आहे का आणि असेल तर तिचा दक्षिण कर्नाटकावर कितपत प्रभाव आहे याची परीक्षा या दोन पोटनिवडणुकांनी होणार आहे. त्याशिवाय कर्नाटाकातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असतानाच या पोटनिवडणुका होत असल्यामुळे त्याही दृष्टीने त्यांना महत्त्व आलेले आहे. एस. एम. कृष्णा हे दक्षिण कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजपामधील आगमनाचा ताबडतोबीचा फायदा या दोन पोटनिवडणुकात होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment