नवी दिल्ली: प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांमध्ये होत असलेले यांत्रिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाचा बेसुमार वापरामुळे सुमारे १४ लाख कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बेकारीचा सर्वाधिक फटका मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. आयटी उद्योग क्षेत्र आपले झपाट्याने ऑटोमेशन करत अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार स्वत:त बदल करत आहे. एकदा का नव्या तंत्रज्ञानामुळे कंपन्यांमधील काम ऑटोमेशन पद्धतीने सुरू झाले की, कर्मचारी म्हणून लागणाऱ्या मनुष्यबळाची फारशी गरज लागणार नाही. कर्मचाऱ्यांच्या बेकारीचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
१४ लाख कर्मचारी होऊ शकतात बेरोजगार
८ ते १२ वर्षांचा अनुभव माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात मध्यम स्तरावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाकडे असतो. या कर्मचाऱ्याचे वेतन वार्षिक १२ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत असते. आयटी उद्योग क्षेत्रात सध्या रीस्किलिंग आणि पुनर्रचनेचे वारे वाहत आहेत आणि याच्या केंद्रस्थानी मध्यम स्तरात काम करणारा कर्मचारी वर्गच असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ईन्फासिसचे सीईओ विशाल शिक्का यांनी गेल्या वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की बाहेरील जगाशी मिडल लेव्हल मॅनेजमेंटचा काहीएक संबंध नाही आणि हेच समस्येचे खरे मूळ आहे. एक कर्मचारी किती कर्मचाऱ्यांना मॅनेज करतो यावर आयटी क्षेत्रात करिअरचा विकास होत असतो असे तज्ज्ञांकडून वर्षानुवर्षे सांगण्यात आले आहे. हा कर्मचारी वर्ग किती नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतो यावर कधीही लक्ष पुरवले गेले नाही असेही सिक्का यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बड्या कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन पद्धत आजच मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. त्यामुळे या बड्या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लगुउद्योगांवर मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण झाली आहे. हे लगुउद्योग आगोदरच धोक्यात आले आहेत. त्यामुळे हे कर्मचारी बेकार झाल्यास पुन्हा एकदा मंदी आणि आर्थिक संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.