हरियाणात मस्तवाल रेडा सुल्तानचा जलवा


जादा दूध देणार्‍या म्हशी पाळणे गवळ्यांसाठी फायद्याचे ठरते व त्यामुळे अशा म्हशींना चांगली किंमत मिळते याची आपल्याला जाणीव आहे. त्या मानाने रेड्यांना फारसा भाव नसतो व ते फार कामाचेही नसतात. हरियाणातील सुल्तान नावाचा रेडा मात्र याला अपवाद असून सध्या तेथे सुरू असलेल्या सुरजकुंड पर्यटन केंद्रावरील दुसर्‍या कृषी नेतृत्व परिषदेत सुल्तानची जोरदार चर्चा सुरू आहे. ७ वर्षे १० महिने वयाचा हा रेडा १७०० किलो वजनाचा व सहा फुटांपेक्षा उंच आहे. जगातील तो सर्वात उंच रेडा असल्याचा दावा त्याचे मालक राम नरेश बेनिवाल करतात. हा रेडा मुर्राह जातीचा आहे.

सुल्तानचा राजेशाही थाट वर्णनापलिकडचा आहे. हा रेडा मालकाला वर्षाला साधारण ९० लाख रूपयांची कमाई त्याच्या वीर्य विक्रीतून करून देतो. त्यामुळे त्याची बडदास्त फारच उत्तम ठेवली जाते. सुल्तानला रोज सायंकाळी १०० ग्रॅम स्कॉच दिली जाते. दररोज वेगळ्या ब्रँडची स्कॉच पिणार्‍या सुल्तानसाठी मंगळवार हा ड्राय डे असतो. त्याला रविवारी टीचर्स, सोमवारी ब्लॅक डॉग, बुधवारी पायपर, गुरूवारी बेलनेटडिन, शुक्रवारी ब्लॅक लेबल व शनिवारी शिवास रिगल स्कॉच दिली जाते.

याशिवाय त्याला १० किलो धान्य, तेवढेच दूध, ३५ किलो हिरवा व सुका चारा, थंडीच्या दिवसात १० किलो सफरचंदे व उन्हाळ्यात २० किलो गाजरे खायला घातली जातात. त्याच्या खाण्याचा रोजचा खर्च २५०० रूपये आहे. सुल्तानचे आठवड्यातून दोन वेळा वीर्य म्हणजे सीमेन काढले जाते व प्रत्येक डोससाठी ३०० रूपये याप्रमाणे ते विकले जाते. या शिवाय अनेक स्पर्धांमधून त्याने रोख बक्षीसे मिळविली आहेत. गतवर्षी राजस्थानातील पुष्कर मेळ्यात एका परदेशी नागरिकाने त्याला २१ कोटी रूपये देऊन खरेदीची तयारी दाखविली मात्र मालक बेनिवाल यांना सुल्तानची विक्री करायची नाही कारण ते त्याला पोटच्या मुलासारखे सांभाळतात.

Leave a Comment