१९९५ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लातूर मतदारसंघात विलासराव देशमुख हे फार वाईट रितीने पराभूत झाले होते. १९८० पासून सातत्याने विजयी झालेले विलासराव देशमुख हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते पण ते तब्बल ४५ हजार मतांनी पडले. लातूर हा शहरातले मोठे मतदान असलेला मतदारसंघ असून या शहरात मारवाडी, लिंगायत या जातींचे प्राबल्य आहे. एखादा नेता त्यांच्या व्यापारी हितसंबंधांत बाधा आणायला लागला की ते त्याला निवडणुकीत धडा शिकवतात. त्यांनीच विलासरावांचा पराभव केला होता. त्यानंतर एकदा पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी विलासरावांंचा पराभव फार मोठ्या फरकाने झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा विलासराव देशमुख यांनी ते नाकारले आणि आपण तर मामुली मतांनी पडलो आहोत असे म्हटले.
जिलेबी फाइल्स
पत्रकारांना सुरूवातीला काही बोध झाला नाही पण, देशमुख यांनी, मामुली चा अर्थ स्पष्ट करताना, मा म्हणजे मारवाडी, मु म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत असा खुलासा केला. आपल्या देशातल्या राजकारणात अशी जातींच्या नावांपासून तयार होणारी अनेक समीकरणे लोकप्रिय आहेत. आता कर्नाटकात एक नवे समीकरण समोर आले आहे. ते काही निवडणुकीतून पुढे आलेले नाही तर तिथले कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्रामय्या यांच्या पक्षपाती कारभारातून समोर आले आहे. नुकतेच कर्नाटकाचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्ष नेते जगदीश शट्टर यांनी, मुख्यमंत्री जिलेबी फायलींवर सह्याच करीत नाहीत असा आरोप केेला. त्यांना सही करायची असेल तर नॉन जिलेबी फाईलच लागते असे शट्टर म्हणाले.
सर्वांना एकदम स्पष्ट झाले नाही पण जिलेबी फाईल म्हणजे जीएलबी फाईल असा त्यांनी सांगितले. जी म्हणजे गौडा (वक्कलीग), एल म्हणजे लिंगायत आणि बी म्हणजे ब्राह्मण. या तीन उच्च जाती आहेत. त्यांच्या फायली सिद्रामय्या नेहमी प्रलंबित ठेवतात कारण त्यांच्या मनात या उच्च जातींविषयी आकस आहे. त्यांचा कारभार असा पक्षपातीपणाचा आहे. आता वक्कलीग समाजाचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी कालच भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा हे लिंगायत आहेत. अनंतकुमार हे ब्राह्मण नेते राज्याच्या राजकारणात सक्रिय असून आता केन्द्रात मंत्री आहेत. या तिघांनी राज्याच्या राजकारणात या तीन जातींचे प्राबल्य वाढवले आहे.