स्वाती सिंग यांची झेप


आजपासून बरोबर आठ महिन्यांपूर्वी लखनौच्या स्वाती सिंग यांना तुम्ही आठ महिन्यांनी उत्तर प्रदेशात मंत्री होणार आहात असे सांगितले असते तर त्यांनी त्या सांगणार्‍याला वेड्यात काढले असते. कारण स्वाती सिंग यांचा तेव्हा तरी राजकारणाचा काडीचाही संबंध नव्हता. असलाच तर त्यांच्या पतीचा दयाशंकर सिंग यांचा राजकारणाशी संबंध होता आणि स्वाती सिंग ह्या निवृत्त प्राध्यापिका म्हणून गृहिणी पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांचे पती दयाशंकर सिंग हे मात्र उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष होते आणि भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत भाषण करताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी बसपा नेत्या मायावती यांच्यावर अश्‍लिल स्वरूपाचची टीका टिप्पणी केली. त्यामुळे ज्या घटना घडण्यास सुरूवात झाली त्याचा अंत स्वाती सिंग यांच्या मंत्री होण्यात झाला.

दयाशंकर सिंग यांच्या त्या प्रलापांमुळे भारतीय जनता पार्टीची अवस्था फार अडचणीची झाली. पक्षाने त्यांना निलंबित केले आणि सरकारने त्यांच्या विरोधात खटला दाखल केला. पुढे त्यांना अटक झाली. मात्र दयाशंकर सिंग यांच्या प्रलापांना उत्तर देण्यासाठी बसपा नेते नसिमुद्दीन सिद्दिकी यांनी तीच चूक केली. यावेळी नसिमुद्दीन सिद्दिकी यांनी दयाशंकर सिंग यांना जशास तसे उत्तर देताना त्यांच्या पत्नी स्वाती सिंग आणि मुलगी यांच्याविरुध्द अशिष्ट शेरेबाजी केली. त्यामुळे स्वाती सिंग चिडल्या आणि त्यांनी पदर खोचून भाजपात प्रवेश करायचे ठरवले. त्यांनी आता बहुजन समाज पार्टीच्या विरोधात जबरदस्त मोर्चा उघडला. त्या मुळात प्राध्यापिका असल्यामुळे उत्तम वक्त्या आहेत. त्यामुळे थोड्याच दिवसात त्या उत्तर प्रदेशामध्ये जनतेच्या आकर्षणाच्या विषय ठरल्या. भाजपाने त्यांना उत्तर प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून नेमले.

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्वाती सिंग यांना लखनौच्या सरोजिनी नगर या मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कधीच निवडून आलेला नव्हता. परंतु स्वाती सिंग यांनी ती परंपरा खंडित केली आणि रालोद पक्षाचे आपले नजिकचे प्रतिस्पर्धी शारदा प्रताप शुक्ला यांचा १ लाख ८ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात पाच महिला मंत्री असून त्यातील एक मंत्री म्हणून स्वाती सिंग यांना घेण्यात आले आहे. आठ महिन्यांपूर्वी राजकारणात काहीच नसलेल्या स्वाती सिंग यांना पदार्पणातच राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला.

Leave a Comment