पनामात उभारले जातेय प्लॅस्टीक व्हिलेज


प्लॅस्टीकचा शोध हा जगातला एक अद्भूत शोध मानला जातो मात्र आता या प्लॅस्टीकमुळेच पृथ्वीच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवसेनदिवस वाढत जाणारा प्लॅस्टीक कचरा जगभरातील देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तरीही या प्लॅस्टीकचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करता येईल यावर संशोधनही केले जात आहे. पनामा देशात प्लॅस्टीकच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करून घर बांधणी केली जात असून अशा बाटल्यांच्या घरबांधणीतून येथे प्लॅस्टीक व्हिलेज वसविले जात आहे.

घर बांधायचे म्हणजे वाळू, दगड, माती, चुना, सिमेंट, लोखंड, लाकूड हवेच. पण या सार्‍यांना फाटा देऊन केवळ प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर करून ही घरे उभारली जात आहेत. ८३ एकरांच्या परिसरात हे प्लॅस्टीक व्हिलेज साकारत आहे. यात १ घर बांधण्यासाठी १४ हजारांपेक्षा अधिक बाटल्यांचा वापर केला जात असून अशी १२० घरे बांधली जाणार आहेत. शिवाय या गावात सार्वजनिक केंद्र, पॅव्हॅलियन, बागाही प्लॅस्टीक बाटल्यांच्या वापरातूनच उभारल्या जाणार आहेत. या घरांना एसीची गरज नाही कारण उन्हाळ्यात या घरांचे तापमान प्लॅस्टीकच्या वापरामुळे आपोआपच कमी राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. शिवाय मजबुतीबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचेही समजते. यातून पर्यावरण रक्षण होणार आहेच शिवाय प्लॅस्टीक बाटल्यांचा पुनर्वापर होणार असल्याने कचरा कमी होणार आहे.

Leave a Comment