होंडाची दमदार 'बुलेट' देणार रॉयल एन्फिल्डला टक्कर ! - Majha Paper

होंडाची दमदार ‘बुलेट’ देणार रॉयल एन्फिल्डला टक्कर !


नवी दिल्ली: टेलिकॉम इंडस्ट्री जिओमुळे धास्तावली असतानाच आता ऑटो इंडस्ट्रीमध्येही रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी एक प्रतिस्पर्धी कंपनी तयार झाली आहे. होंडा रॉयल एन्फिल्ड टक्कर देण्यासाठी मैदानात उतरत असून दमदार बुलेट बाईक्सची निर्मिती करणार आहे. त्यामुळे आता होंडा रॉयल एन्फिल्डला किती आणि कशी टक्कर देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत एशियन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडचे प्रमुख नोरिअक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रोजक्टवर काम करण्यासाठी कंपनीने एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये थायलँड आणि जपानमधील काही निवडक तज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात पाठवून बाईकच्या डिझाईनची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतात जर या बाईकची निर्मिती झाली, तर बाईक जपानलाही निर्यात केली जाईल, अशी माहिती नोरिअक यांनी दिली आहे. होंडाजवळ आधीपासूनच ३००-५०० सीसीमध्ये दोन बाईक (रिबेल ३०० आणि रिबेल ५००) आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनीचे लक्ष आहे.

रॉयल एन्फिल्डच्या एकूण ५.९२ लाखांहून जास्त युनिट्सची विक्री २०१६-१७ मध्ये करण्यात आली असून १३,८१९ युनिट्स निर्यात करण्यात आली आहे. होंडा प्रतिस्पर्धी म्हणून बाजारात येत असली तरी रॉयल एन्फिल्डला टक्कर देणे त्यांच्यासाठी सोपे नसणार आहे असे जाणकारांनी सांगितले आहे. रॉयल एन्फिल्डला बाजारात प्रचंड मागणी असून त्यांचा ग्राहक आपल्याकडे आकर्षित करणे सोपे नसणार आहे. रॉयल एन्फिल्डच्या ‘हिमालयन’ बाईकचे ग्राहक फक्त भारतात नसून संपुर्ण देशभरात आहेत.

Leave a Comment