आपण यांना पाहिलंत का ?


उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या पदरात फारच निराशा पडली. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते चिडले आहेत. एका जिल्हा कॉंग्रेस कार्यालयाच्या बाहेर त्यांनी एक पोष्टर लावून आपला रोष प्रकट केला. या निवडणुकीतले कॉंग्रेसचे सल्लागार प्रशांत किशोर यांच्यावर त्यांचा राग आहे कारण याच माणसाने कॉंग्रेसला चांगले यश मिळेल अशी ग्वाही दिली होती. या सल्ल्यासाठी त्याचे शुल्क किती असते हे काही माहीत नाही पण जे काही दिले असेल ते शुल्क बुडले आहे. आता प्रशांत किशोर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना साधी भेटही देत नाहीत. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी एका पोष्टरवर त्यांचा फोटो छापून, हरवले आहेत असे जाहीर केले आहे. त्यांना शोधून देणाराला पाच लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल असे या पोष्टरवर जाहीर करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात प्रशांत किशोर यांच्याच सल्ल्यावरून माजी खासदार चित्रपट अभिनेता राज बब्बर यांना निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. राज्यात ज्या पाच जातींचा प्रभाव आहे त्या पाच जातीच्या नेत्यांचा समावेश असलेली प्रचार समिती स्थापन करण्यात आली होती. पण या समितीला निवडणुकीत आपला प्रभाव पाडता आला नाही. राज्यात १०० जागा मिळवणे हे प्रशांत किशोर आणि कॉंग्रेसचे उद्दिष्ट होते पण या उद्दिष्टाचे काय झाले हे आपण पाहिलेच आहे. हा पराभव नेमका कोणाचा ? पक्षाचा की प्रशांत किशोर यांचा ? कार्यकर्ते तर हा प्रशांत किशोर यांचाच पराभव मानत आहेत. मात्र राज बब्बर यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला असून हे पोष्टर लावणाराला पक्षातून निलंबित केले आहे. पराभवाला कोणीही एकटा माणूस जबाबदार नसतो असे त्यांचे म्हणणे आहे. पण कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत कारण वर्षभर ते प्रशांत किशोर यांच्या सांगण्यावरून कष्ट करीत होते.

त्यांनी प्रत्येक मतदानकेन्द्रावर कार्यकर्ते तयार करण्यावर भर दिला होता. त्यांनी प्रशांंत किेशोर यांच्या सांगण्यावरून काही आंदोलने केली होती. पण प्रशांत किशोर यांचा फॉर्म्युला काही यशस्वी ठरलेला नाही. कॉंग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या असत्या तर त्या विजयाचे श्रेय प्रशांत किशोर यांना मिळाले असते पण आता ते पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचा कोणत्याही पक्षाला हमखास विजय मिळवून देण्यात हातखंडा आहे असे म्हटले जाते पण ते काही खरे नाही. ते कोणत्याही पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात पण मुळात त्या पक्षात काही दम असला पाहिजे. कॉंग्रेसमध्ये दम नव्हता. आता त्यांना जबाबदार धरण्यात काही मतलब नाही.

Leave a Comment