फोर्ब्जच्या यादीत बिल गेट्स जगात सर्वात श्रीमंत


नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंतांच्या फोर्ब्सच्या यादीत बिल गेट्स पुन्हा एकदा पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीतील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्थान घसरले आहे. त्यांची २२० क्रमांकावरून ५४४ व्या स्थानी घसरण झाली आहे. सलग चौथ्या वर्षी गेट्स पहिल्या स्थानी राहिले आहेत. बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची ७५.६ अब्ज डॉलर संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या तर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत. जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २ हजार ०४३ वर पोहोचली आहे.

फोर्ब्जकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या यादीच्या ३१ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठी झेप आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे. या यादीतील अब्जाधीशांमध्ये ५६५ अमेरिका, चीन ३१९, जर्मनीतील ११४ जण आहेत. अब्जाधीशांच्या या यादीत भारतातील १०१ व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील १३ व्यक्तींना पहिल्यांदाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. भारताकडून मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची २३.२ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. या यादीत ते ३३ व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्या स्थानी होते. त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल ५६ व्या स्थानी, तर अझीम प्रेमजी ७२ व्या स्थानी आहेत. दिलीप संघवी ८४ तर शीव नाडर १०२व्या स्थानी आहेत.

Leave a Comment