एअर इंडिया पुरवणार वाय-फाय सेवा !


नवी दिल्ली : तुम्ही येत्या काही दिवसात विमानातूनही मेल किंवा चॅटिंग करु शकता. देशांतर्गत विमानांमध्ये एअर इंडिया वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत असून याची सुरुवात एअर इंडियाच्या ‘ए-३२०’ या विमानातून केली जाणार आहे. अशाप्रकारे वायफाय एअर इंडियाने सुरु केल्यास, विमानात वायफाय पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली विमान कंपनी ठरणार आहे.

आमच्या विमानांमध्ये आम्ही वायफाय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असून सुरक्षिततेबाबत विमान बनवणाऱ्या कंपनीकडून हिरवा कंदिल मिळाला की ही सेवा सुरु केली जाईल. वायफाय विमानात कशाप्रकारे सुरु करता येईल, यावर विमान बनवणाऱ्या एअरक्राफ्ट उत्पादकांशी चर्चा सुरु आहे. नेमकी तारीख सांगणे कठीण आहे, पण जून किंवा जुलैपर्यंत देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा सुरु केली जाईल, अशी माहिती एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांनी सांगितले. विमानांमधील वाय-फायला किती स्पीड असेल आणि प्रवाशांना किती डेटा वापरण्याची मर्यादा असेल, याबाबत अधिक स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आले नाही.

एअर इंडिया सुरुवातीला मोफत वायफाय देण्याची शक्यता आहे. मात्र, विशिष्ट अवधीनंतर या सेवेसाठी पेसे आकारण्याची शक्यताही आहे. मोफत वायफायमध्येही इमेल चेक करणं, पाठवणं,व्हॉट्सअॅप यांचा समावेश असू शकतो. इमेल, व्हॉट्सअॅपसोबत आणखी कोणत्या गोष्टींसाठी वायफाय सेवेचा लाभ घेता येईल, हे एअर इंडियाकडून अधिकृत सांगण्यात आले नाही. देशांतर्गत विमानसेवेत वायफाय सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून या सेवाचा पुढे विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेतही वायफाय देण्यावर विचार केला जाईल.

Leave a Comment