सिंहावरून वरातीची अशी भागविली हौस


आजकाल लग्नसमारंभ कांही हटके स्टाईलने करण्याची पद्धत रूळत चालली असली तरी अजूनही नवरदेवाची वरात घोडा किंवा सजविलेली गाडी, फारतर बग्गी किंवा महागड्या कारमधून काढली जाते. पाकिस्तानात आजकाल वरात वेगळ्या तर्‍हेने काढण्याची रेसच लागली असून एका नवरदेवाने मंडपात डब्ल्यू डब्ल्यू इ सामन्यातील मल्लांप्रमाणे प्रवेश करून धमाल उडवून दिली होती. त्यालाही मागे सारणारी एक वरात पाकिस्तानात आता गाजते आहे. या वरातीत नवरदेवाने सिंहावरून वरात काढली. विशेष म्हणजे हा सिंह अगदी खराखुरा होता व थोडासा रागावलेलाही होता. मात्र नवरदेव किंवा लग्नासाठी जमलेल्या १५ हजार वर्‍हाड्यांनी त्याची अजिबात पर्वा केली नाही अथवा ते सिंहाला घाबरलेही नाहीत. कारण हा जिवंत सिंह पिजर्‍यात बंद होता व या पिंजर्‍यावर खुर्ची ठेवून नवरदेवाची स्थापना केली गेली होती.

या वरातीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजतो आहे. पाकिस्तानच्या मुल्तान शहरातील शेख मोहम्मद यांनी ही अशी वेगळी वरात काढली. वर पार्टी सधन असल्याने वराला बाशिंगही सोन्याचे बांधले गेले होते. सिंहावरून निघालेल्या या वरातीचा व्हिडीओ पाहून कांही जणांनी नाराजीही व्यक्त केली पण हौसेपुढे कशाचीच पर्वा केली गेली नाही. वधू पार्टीही चांगलीच सधन होती. त्यांनी तब्बल पाच कोटी रूपये हुंडा दिला व थाटात लग्न करून दिले. एकच वाईट म्हणजे या खर्चिक लग्नाची नोंद तेथील कर विभागाने घेतली व वधूवर पक्षांना नोटिसा जारी करून त्याचे उत्तर २४ मार्चच्या अगोदर देण्यास बजावले आहे.

Leave a Comment