कोणताही नाग साप पाहिला तर त्यापासून चार हात दूर पळणे ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. त्यातून अजगरासारखे जनावर असेल तर मग पळता भुई थोडी होण्याची वेळ येते. अजगर आपल्या शरीरावर येतोय असा नुसता भास झाला तरी अनेकांची शुद्ध हरपेल, भीतीने बोबडी वळेल. पण जर्मनीतील एका सलूनमध्ये गेली १३ वर्षे एक अजगर मसाजिस्ट म्हणून सेवा देत आहे आणि या मसाजसाठी वेगळा चार्ज आकारला जात नाही. हा अजगर मानेसाठी मसाज करण्यात एक्स्पर्ट समजला जातो.
या पार्लरमध्ये आहे मसाज करणारा अजगर
अजगराकडून मसाज अशी कल्पना करणेही खरेतर अवघड आहे. या मसाजमुळे स्नायू सैलावण्याअगोदर भीतीने आखडतील असेही आपल्याला वाटेल. पण ज्यांनी हा मसाज करून घेतला आहे त्यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. जर्मनीच्या ड्रेस्डन येथील द हार मोड टीम सलून मध्ये मोंटी नावाचा हा अजगर आहे. त्याची चर्चा जगभरात केली जाते आहे. अन्य मसाज झाला की ग्राहकाच्या गळ्यात हा अजगर घातला जातो. सुरवातीला भीती वाटली तरी हा अजगर हळूहळू सर्व टेन्शन दूर करतो असा अनुभव सांगितला जातो. त्याच्या मसाजसाठी वेगळा चार्ज नाही मात्र ग्राहक अजगराच्या भोजनासाठी इच्छेनुसार दान देऊ शकतात.
मानेभोवती अजगराची मिठी पडली की गार वाटणार ही कल्पना येथे खोटी ठरते. प्रत्यक्ष अजगराचा स्पर्श उबदार तर असतोच पण हळूहळू मानेचा ताण पूर्णपणे नाहीसाही होतो असा अनुभव ग्राहक सांगतात.