हाँगकाँग म्हणजे मायानगरी. उंच उंच इमारती, कॅसिनो, झगमगाटी दुनिया असलेला देश अशी जगभरात प्रतिमा आहे. पर्यटकांची या देशाला भेट देण्यास खूपच पसंती असते. हाँगकाँगचे नाईट लाईफ, या छोट्याशा बेटावर असलेली अनेक प्रेक्षणीय स्थळे त्यांना मोह घालत असतात. याच बेटावर एक खास डोंगरही आहे मात्र तेथे जाण्यासाठी फारसे कुणीच स्वारस्य दाखवित नाही कारण हा आहे थडग्यांचा डोंगर.
थडग्यांचा पर्वत पाहायला हाँगकाँगला चला
हाँगकाँगच्या पश्चिम भागात पोख फु लाम नावाची जागा आहे. तेथे जवळच हा डोंगर आहे. येथे दूरपर्यंत फक्त थडगीच दिसतात. अनेक थडग्यांमुळेच हा डोंगर निर्माण झाला आहे. लक्षावधी थडगी येथे आहेत. एका थडग्याकडून वरच्या थडग्याकडे जाण्यसाठी पायर्याही आहेत. मात्र येथे एकटेदुकटे जाण्यास कुणीच धजावत नाही. असे सांगतात १८८२ पासून ही चायनिज ख्रिश्चनांची सिमेट्री आहे. तेव्हापासून आजतागायत येथे प्रेते पुरणे म्हणजे थडगी बांधणे सुरूच आहे. हाँगकाँग हे मुळातच डोंगराळ बेट असून चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याने येथे जागेची कमतरता आहे. यामुळे या कबरस्थानात एकावर एक थडगीही दिसतात. दिवसेनदिवस हा डोंगर उंचीने वाढत चालल्याचेही सांगितले जात आहे.