उत्तर प्रदेशचे आव्हान


उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती बर्‍याच अंशी अपेक्षित असली तरी अनेक प्रकारच्या चर्चांना चालना देणारी ठरली आहे. उत्तर प्रदेश हे राज्यच आव्हानात्मक आहे. कारण त्या राज्याची लोकसंख्या दोन दशलक्षाच्या जवळपास आहे. यूरोप खंडात एवढा मोठा एखादा देशसुध्दा नाही. इतके हे मोठे राज्य आहे आणि विस्ताराने मोठे असल्यामुळे व्यवस्थापनाला अवघड आहे. देशातला कोणताही चांगला प्रशासक किंवा राज्यकर्ता उत्तर प्रदेशात चांगले प्रशासन देण्यास यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच उत्तर प्रदेशातल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतर करावे लागते आणि हजारो तरुण अन्य राज्यात जाऊन रोजगार मिळवत असतात. दुसर्‍या राज्यात जाऊन रोजगार मिळवण्यात वाईट काही नाही परंतु स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होत नाही म्हणून परराज्यात जावे लागते. ही वस्तुस्थिती विदारक आहे. असे असल्यानेच जगातल्या अर्धपोटी लोकांपैकी १० टक्के अर्धपोटी लोक एकट्या उत्तर प्रदेशात राहतात.

असे असले तरी उत्तर प्रदेशाला निसर्गाने भरपूर दिलेले आहे. उत्तर प्रदेशाची जमीन सुपिक आहे आणि गंगा, यमुना या शेतीला भरपूर पाणी पुरवत असतात. बुंदेलखंडासारख्या दुष्काळी भागाचा अपवाद वगळता उत्तर प्रदेशाच्या कोणत्याही भागात दुष्काळ फार अपवादानेच पडतो. त्यामुळे उत्तर प्रदेशाला निसर्गाने संपन्नतेचे वरदान दिले असूनही तिथे मोठ्या भागात दारिद्य्र नांदत आहे. तेव्हा उत्तर प्रदेशाचा व्यवस्थित विकास करून त्याला देशातले एक श्रीमंत राज्य बनवण्याचे मोठे आव्हान योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे आहे. बर्‍याच वर्षानंतर उत्तर प्रदेशात अशी एक स्थिती निर्माण झाली आहे की केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात परिवर्तन घडवण्यासाठी प्रशासकीय दृष्ट्या अनुकूल वातावरण आहे. त्याचा भरपूर फायदा योगी आदित्यनाथ यांनी घेतला पाहिजे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. राज्याचा व्याप मोठा आहे आणि प्रशासनाचा पसारा मोठा आहे म्हणून हे दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत असे सकृतदर्शनी वाटू शकते परंतु ते तसे झालेले नाही. योगी आदित्यनाथ यांना प्रशासनाचा फार अनुभव नाही त्यामुळे हे दोन अनुभवी मंत्री त्यांच्या मंित्रमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेतच. शिवाय राज्यातले जातीय समीकरण सांभाळण्यासाठीसुध्दा ही व्यवस्था करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री होण्याची तयारी पूर्वीपासूनच केली असेल असे जाणवते. कारण त्यांचे नाव जाहीर होताच पूर्ण मंत्रिमंडळ जाहीर झाले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातही विभागीय आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. मंत्रिमंडळातील महिलांची संख्या बरीच कमी आहे. परंतु एक मुस्लीम मंत्री या मंत्रिमंडळात आहे याची सर्वांनी दखल घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टी हा मुस्लीम समाजाच्या विरोधातला पक्ष आहे. असा काही लोकांचा प्रचार असतो. परंतु पक्षाने तो सातत्याने नाकारला आहे. पक्षाचे हे स्पष्टीकरण तात्विकदृष्ट्या कितपत समर्थनीय आहे हा मोठाच चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एक मुस्लीम मंत्री आहे ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय आहे. कारण पक्ष मुस्लिमांच्या विरोधात नसला तरी योगी आदित्यनाथ हे मुस्लिमांच्या विरोधात आहेत हे नाकारता येत नाही. त्यांची आजपर्यंतची वाटचाल कट्टर हिंदुत्वाच्या वाटेवरून झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात एक मुस्लीम मंत्री असणे हे त्यांच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे.

एखाद्या राजकीय पक्षाची विचारसरणी काहीही असली तरी तो पक्ष सत्तेवर येतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कारभार करताना वस्तुस्थितीला धरून करावा लागतो आणि तो भारतीय राज्य घटनेने ठरवून दिलेल्या मार्गानेच करावा लागतो. योगी आदित्यनाथ यांची विचारसरणी हिंदुत्ववादी असली तरी त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्य घटनेेने आखून दिलेल्या सेक्युलॅरिझमच्या तत्वांच्या आधारेच ते करावे लागेल आणि हे तारतम्य योगी आदित्यनाथ यांना लक्षात येईल अशी अपेक्षा आपण करूया. उत्तर प्रदेश विकासाच्या क्षेत्रात फार मागे पडलेला प्रांत आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून या हिंदी भाषिक पट्ट्याला बिमारू राज्ये असे म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु या नावातली अन्य राज्ये हळूहळू नामाभिधानातून बाहेर पडत आहेत आणि विकासाच्या वाटेवर दमदार वाटचाल करत आहेत. त्याचा विचार करून योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा आहे. हिंदुत्ववाद ही एक विचारसरणी आहे परंतु राज्याचा कारभार बघताना तो दुय्यम ठरत असतो. राज्य कारभारातले नित्य समोर येणारे विषय हे प्रशासन, विकास, कायदा सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार अशा विविध प्रकारचे असतात. तेव्हा त्यांच्यासंबंधात निर्णय घेताना धर्माचा निकष अनावश्यक ठरतो. याचे भान ठेवून उत्तर प्रदेशातले योगीराज जारी राहील ही शुभेच्छा.

Leave a Comment