अखेर आयडिया-व्होडाफोनची हात मिळवणी !


नवी दिल्ली – आपल्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी केली असून दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या कंपनीला सुमारे ४० कोटींचा ग्राहकवर्ग प्राप्त होणार असून, ही दूरसंचार क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे.

व्होडाफोनला ४५ टक्के हिस्सेदारीची मालकी या कंपनीत मिळणार आहे. सुमारे २६ टक्के हिस्सेदारीवर आयडियाचा हक्क असणार आहे. दोन्ही कंपन्यांना संचालक मंडळावर प्रत्येकी तीन सदस्य नेमण्याचा अधिकार असेल. दूरसंचार क्षेत्राला मिळणाऱ्या उत्पन्नात सुमारे ४३ टक्के वाटा मिळणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

देशातील दूरसंचार क्षेत्र मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या आगमनाने धास्तावले आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांनी आपापल्या पातळीवर जिओला टक्कर देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. आयडिया आणि व्होडाफोनचे एकत्रीकरण हा त्याचाच भाग म्हणता येईल. त्याचप्रमाणे, भारती एअरटेलने गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिनॉरचा व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय, रिलायन्स कम्युनिकेशन्स-एअरसेल-एमटीएस यांच्या संभाव्य विलीनीकरणात टाटा समुहाला निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे.

Leave a Comment