गोव्यात कॉंग्रेसला सर्वात जास्त जागा मिळूनही सरकार स्थापन करता आले नाही. याची चीड येऊन नवनिर्वासित आमदार विश्वजीत राणे यांनी आमदारपणाचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांचे चिरंजीव आहेत. याच निवडणुकीत प्रतापसिंग राणे हेही निवडून आले आहेत. त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेते निवडून आले असतानाही या पक्षाला सरकार का स्थापन करता आले नाही असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. त्याचे उत्तर पक्षातून मिळत नसले तरी विश्वजीत राणे यांच्या राजीनाम्यातून मिळाले आहे. सरकार स्थापन करण्याबाबत दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी हालचाली केल्या नाहीत असे विश्वजीत राणे यांच्या म्हणण्यात आले असून त्यांंनी सादर केलेल्या राजीनाम्यातही तसेच म्हटले आहे.
गोव्यात कॉंग्रेसला आहेर
घरात नेतृत्वाची परंपरा असल्यामुळे विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असणारच. त्यांनी निवडणुका होताच त्या दिशेने हालचालीही सुरू केल्या होत्या. त्यांनी या निमित्ताने दिल्लीतल्या नेत्यांना फोन केले पण त्यांचे फोन घेण्याचीही तत्परता कोणी दाखवली नाही. आपले नेते आपले फोन आले तेव्हा वातानुकूलित कक्षांमध्ये आराम करीत होते असे राणे यांनी म्हटले आहे. पक्षाच्या नेत्यांची ही उदासीनता पाहून चिडलेल्या राणे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याने त्यांच्या जागेवर पोट निवडणूक होईल. ती आपण अपक्ष म्हणून लढवणार असे त्यांनी आताच जाहीर केेले आहे. आपण पक्षाच्या नेतृत्वावर केलेल्या या हल्ल्याचे अनेक तरुण आमदारांनी स्वागत केले असून आपल्या मागोमाग आणखी काही आमदार राजीनामे देणार असल्याचे राणे यांनी सूचित केले आहे. एकंदरित गोव्यातल्या कॉंग्रेसमध्ये मोठी खदखद निर्माण झालेली दिसत आहे.
केवळ राणेच नाही तर इतरही काही नेत्यांनी आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर मोठी टीका करायला सुरूवात केली आहे. मुंबईतल्या माजी खासदार प्रिया दत्त यांनीही दोन दिवसांपूर्वी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. पक्षातून असा उठाव झाला तर राहुल गांधी यांच्या जागी अन्य कोणाची तरी उपाध्यक्ष म्हणून नेमणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. तसे झाले तर पक्षाच्या वाटचालीला चांगली दिशा मिळण्याची शक्यता वाटायला लागली आहे.