नई दिल्ली: देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांचे रिलायंस जिओने डेटा आणि मोफत कॉल सुविधा देऊन कंबरडे मोडले आहे. अनेक खासगी प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्याला टक्कर देण्यासाठी त्यांचे कॉल रेट्स कमी केले आहेत तसेच डेटा प्लानमध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत. यात आता सरकारी कंपनी बीएसएनएल देखील उतरली आहे. आता एक धमाकेदार प्लान बीएसएनएलने लॉन्च केला आहे. यात केवळ ३९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोज दोन जीबी ३जी डेटा फ्री मिळणार आहे. तसेच बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड फ्रि कॉल असणार आहे.
बीएसएनएल देणार रोज २ जीबी डेटा फ्री
याबाबत माहिती देताना बीएसएनएलने म्हटले आहे की या ऑफरनुसार ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच २८ दिवसांपर्यंत त्यांना रोज दोन जीबी डेटा मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ ९० दिवसांपर्यंत आहे. तर जिओ ३१ मार्च पर्यंत रोज एक जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल फ्रि देत आहे. १ एप्रिलपासून रिलायंस जिओ या सुविधेसाठी प्राइम सबस्क्राइबर्स कडून ९९ रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि ३०३ रुपये मंथली रेंटल घेणार आहे. ही ऑफर जिओ ३१ मार्च, २०१८ पर्यंत देणार आहे.