नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली २००० रुपयांची नोट मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ही माहिती लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात दिली.
२००० रुपयांची नोट मागे घेतली जाणार नाही
अरुण जेटलींनी लेखी उत्तरात दोन हजार रुपयांची नवी नोट रद्द करण्याचा किंवा मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. रामदेवबाबांसह अनेक जाणकार रोकड व्यवहारातील काळा पैसा कमी करण्यासाठी मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याची मागणी करत होते. नेमके हेच कारण केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करताना दिले होते. त्यानंतरही सरकारने २००० रुपयांची नोट नव्याने जारी केली होती. त्यावेळी अनेकांनी २००० रुपयांची नोट ही तात्पुरती सोय असल्याचा बचाव केला होता. मात्र आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या लोकसभेतील लेखी उत्तराने ही नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या ५०० आणि हजाराच्या १२.४४ लाख कोटी रुपयांच्या नोटा १० डिसेंबर २०१६ पर्यंत जमा झाल्या आहेत. या नोटांची फेरमोजणी आणि छानणी करण्याचे काम अजून सुरु आहे. त्यानंतर या नोटांमध्ये बनावट नोटा किती ते समजणार आहे. तसेच काही नोटांची बँकात दोनवेळा मोजणी झाल्याचीही भिती आहे. त्यामुळेच फेरमोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या किती नोटा जमा झाल्या याचा निश्चित आकडा समजणार आहे.