कॉंग्रेसची पुनर्रचना


उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यापासून देशभरात जे राजकीय विश्‍लेषण मांडले जात आहे त्यामध्ये कॉंग्रेस पक्ष हा संपत चाललेला पक्ष आहे. असे सरसकट म्हटले जात असले तरी वस्तुस्थिती तशी आहे का याचा बारकाईने आणि वस्तुनिष्ठ विचार करण्याची गरज आहे. कॉंग्रेस हा संपत चाललेला पक्ष आहे आणि मोदी कॉंग्रेसमुक्त भारत निर्माण करण्याच्या स्वप्नाजवळ चालले आहेत. असे केवळ लोकच मानत आहेत असे नाही तर कॉंग्रेसमधलासुध्दा एक गट त्याच दिशेने विचार करायला लागला आहे. राहुल गांधी मात्र बरेच आशावादी आहेत. पक्ष कधी संपणार नाही, निवडणुकीतल्या हार-पराजयावरून पक्ष संपण्याचे भविष्य कोणी करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय जनता पार्टीचे समर्थक कॉंग्रेस पक्ष संपत चालला असल्याच्या विश्‍लेषणाशी बरेच सहमत होत आहेत. परंतु या पक्षाच्या समर्थकांमध्येसुध्दा एक वर्ग निश्‍चितपणे असा आहे की ज्या वर्गाला कॉंग्रेस पक्ष टिकला पाहिजे असे वाटते. कारण आपण भाजपाचे समर्थक असलो तरी भाजपाच्या कारभारावर अंकुश ठेवणारा एक देशव्यापी राजकीय पक्ष असला पाहिजे असे भाजपाच्या या समर्थकांनासुध्दा वाटते.

तसे न झाल्यास भाजपाचा कारभार निरंकुशपणे सुरू राहील आणि त्यातून अनेक धोके संभवतात, असे मानणारा हा वर्ग आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे जरा शांतचित्ताने विश्‍लेषण केले गेले पाहिजे. उत्तर प्रदेशात भाजपाला अनपेक्षितपणे (भाजपाच्यासुध्दा अपेक्षेबाहेर) यश मिळाले आणि उत्तराखंडामध्ये तर प्रचंड जागा मिळाल्या. या दोन देदिप्यमान विजयामुळे विश्‍लेषणाचा सारा रोख मोदी आणि भाजपा यांच्यावरच राहिलेला आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्यासुध्दा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे तर कॉंग्रेस पक्षाची अवस्था फार वाईट झाल्याचे लोकांनी ठरवून टाकले. पण थोडा विचार केल्यानंतर असे लक्षात येईल की भाजपाला उत्तर प्रदेशात छान यश मिळाले तरी कॉंग्रेसला पंजाबमध्ये मिळालेले यश त्यापेक्षा छान आहे. ११७ सदस्यांच्या या सभागृहात कॉंग्रेसला तब्बल ७७ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे हे कॉंग्रेसचे बहुमत दोन तृतीयांश बहुमतापेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशाच्या जवळपास जाणारे हे यश आहे. पण उत्तर प्रदेशातल्या यशाबद्दल भाजपाचे जसे कौतुक झाले तसे पंजाबमधल्या यशाबद्दल कॉंग्रेसचे कौतुक झाले नाही.

दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. पण त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही. राजकारणातल्या मोदी लाटेमध्ये आणि कौतुकाच्या मोदी लाटेमध्ये लोक हे विसरून चालले आहेत की पंजाबमध्ये भाजपाला एकही जागा मिळालेली नाही. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस जवळपास संपली आहे आणि पंजाबमध्ये काय भाजपा शिल्लक आहे का? विश्‍लेषणात हा मुद्दा कोणी मांडतच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीमध्ये सत्ता मिळणे म्हणजे विजय आणि सत्ता न मिळणे म्हणजे पराभव असा ठोकताळा मांडला जातो. त्या अर्थाने गोवा आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली असल्यामुळे त्यांचा सर्वत्र जयजयकार होत आहे. परंतु लोक हे विसरत आहेत की मणिपूरमध्ये कॉंग्रेसला २८ जागा मिळाल्या असून तो तिथे सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तिथे भाजपाने २१ जागा असूनही म्हणजे दुसर्‍या क्रमांकाच्या जागा असूनही सत्ता मिळवली आहे ही काही कौतुकाची गोष्ट नाही. कौतुक तर कॉंग्रेसचे आहे. जिने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत.

गोव्याची काय परिस्थिती आहे? गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कॉंग्रेसला जे करायला हवे होते ते कॉंग्रेसच्या नेत्यांनी केेले नाही. त्यामुळे सत्ता गमावली परंतु गोव्यातसुध्दा १७ जागा जिंकून कॉंग्रेसने सर्वाधिक मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तिथे मणिपूरप्रमाणेच भाजपाला दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. आधी गोव्यामध्ये भाजपाच्या हाती सरकार होते तेव्हा भाजपाकडे २१ जागा होत्या त्या घटून १३ झाल्या आहेत. देशात जर मोदींची लाट आहे तर त्या लाटेत गोव्यामध्ये भाजपाच्या जागा २१ वरून २५ का नाही झाल्या? २१ वरून १३ वर खाली का आल्या? याचे उत्तर भाजपाच्या समर्थकांनी दिले पाहिजे. गोव्यातही मणिपूरप्रमाणेच बाहेरचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करताना पाठिंबा देणार्‍या बाहेरच्या प्रत्येक आमदाराला मंत्रीपद देऊन भाजपाने तेथे आपल्या राजकीय नीतीमत्तेचे दर्शनच घडवले आहे. पण माध्यमांनी या अनैतिकतेबद्दल भाजपाला दोष दिलेला नाही. उलट वेगाने हालचाली करून सत्ता हस्तगत केली याचे कौतुकच केले आहे. या निकालाबद्दल कॉंग्रेसचे कोणी कौतुक करो की न करो परंतु पंजाबमध्ये कॉंग्रेसला यश का मिळाले याचे नीट विश्‍लेषण करून राहुल गांधी यांनी पंजाबमधलाच संंघटनात्मक ढाचा देशातल्या सर्व राज्यांमध्ये उभा केला पाहिजे. असे केल्यास कॉंग्रेसला लगेच सत्ता मिळेल असे सांगता येणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवणारा सक्षम राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसला नक्कीच उभे राहता येईल.

Leave a Comment